Shivsena UBT News : महापालिका निवडणुकीत मंत्री संजय शिरसाट यांनी आमच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावले, पाच ते पंचवीस लाखांचे आमिष दाखवले. यावरही ऐकत नाही म्हटल्यावर तुमची घरं अतिक्रमाणात आहे, ती पाडतो अशी धमकी दिल्याचा थेट आरोप आज पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. महापालिका तुमच्या बापाची आहे का? मग तुमचे घरं फार नियमात आहेत का? असा सवाल करत दानवे यांनी इशाराही दिला.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी मंत्री, सत्ताधारी पक्षाचे गुलाम अधिकारी दबाव आणत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेत उमेदवारी मागे घेण्यासाठी आधी 25 लाखांची ऑफर देण्यात आली, त्यानंतर घर पाडण्याची धमकी ठाकरे सेनेच्या उमेदवाराला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
महापालिका निवडणुकीसाठी अवघे 12 दिवस शिल्लक असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडत आहेत. महापालिकेची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी शिवसेना, भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टार्गेट करत या पक्षाचे पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक फोडले. त्यामुळे घायाळ झालेल्या ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांना संधी देत 115 पैकी 99 जागांवर उमेदवार दिले आहेत.
ठाकरे गटात एकीकडे चंद्रकांत खैरे- अंबादास दानवे यांच्यात वाद पेटलेला असताना दुसरीकडे विरोधकांकडून देखील ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावरून पक्षाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता. 'लक्षात ठेवा, आमच्याकडेही खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल, वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड ही निश्चित होणार, ...अन्यथा गाढवावरून धिंड काढली जाईल, अशा शब्दात दानवे यांनी इशारा दिला होता.
त्यानंतर आज पुन्हा माध्यमांसमोर 'एका सुपर क्लासवन अधिकाऱ्याने उमेदवाराला फोन केला. त्याआधी संजय शिरसाट यांनी फोन केला होता. मात्र अशा धमक्यांना आमचे उमेदवार घाबरणार नाही. ते धनगर समाजाचे आहेत. अगोदर 25 लाखाचे प्रलोभन देण्यात आले. त्यानंतर अनधिकृत घरे पडण्याच्या धमक्या दिली जाते. घर पडायला महापालिका तुमच्या बापाची आहे का? प्रशासन आणि सत्तेची मस्ती आलेली आहे. अशा अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे.
या सगळ्या गोष्टीच्या हिशोब ठेवला जाईल. मी नावानिशी आरोप केला आहे. माझ्याकडे याचे डिटेल्स आहे. मी कुठल्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, मला कुणाच्या पोटावर मारायचे नाही, पण निवडणूक आयोगाने हे प्रकार तातडीने थांबवावेत आणि उमेदवारांवर दबाव आणणाऱ्या, धमक्या देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहनही दानवे यांनी केले.
माजी महापौर रशीद मामू यांच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे यांच्यात वाद पेटला आहे. दानवे यांच्या पुढाकाराने ठाकरे गटात प्रवेश केलेल्या रशीद मामू यांना उमेदवारी मिळू देणार नाही, असा इशारा खैरे यांनी दिला होता. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता खैरे यांनी मामूंचा प्रचार करणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यावर प्रचार नाही केला तर काय झाले, असा प्रश्न दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.