Ambadas Danve, Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve: सचिन अहिरांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत अंबादास दानवेंवर संशयाची सुई : एका अर्जामुळे आले 'टार्गेटवर'

Ambadas Danve, Sachin Ahir, Shiv Sena UBT: सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटात अंबादास दानवे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिल्हा बँक निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेवरून चंद्रकांत खैरे यांनी निष्ठेबाबत शंका व्यक्त केली.

Jagdish Pansare

Shiv Sena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार सचिन आहिर यांनी अचानकपणे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून थेट त्यांचा अर्ज दाखल करत शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार झटका दिल्याची चर्चा राज्यात सुरू आहे.

कालपर्यंत सोबत असलेले सचिन अहिर अचानक शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार झाले. त्यानंतर आता ठाकरेंच्या पक्षात उरलेल्या इतर आमदार व खासदारांकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. मात्र याच अंबादास दानवे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भूमिकेवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल असताना अंबादास दानवे मात्र सत्ताधारी महायुतीच्या पॅनलकडून निवडणूक लढवत आहेत. एकीकडे पक्षातून जाणाऱ्यांना गद्दार, ५० खोके, १०० खोके असे म्हणत हिणवायचे आणि स्वतः मात्र सहकार क्षेत्रात राजकारण नसते म्हणत सोयीचे राजकारण करत महायुतीच्या तंबूत जाऊन बसायचे, या दानवे यांच्या दुटप्पीपणावर निष्ठावंत शिवसैनिक संतापले आहेत.

सचिन अहिर यांच्यासारखा रात्रंदिवस ठाकरे पितापुत्रांसोबत सावली सारखा वावरणारा आमदार अवघ्या बारा तासात पक्ष सोडून गेल्याने आता विश्वास तरी नेमका कोणावर ठेवावा? असा प्रश्न शिवसेनेत उरलेल्या नेत्यांना आणि सामान्य शिवसैनिकांना पडला आहे. सचिन अहिर यांच्या पक्ष सोडून जाण्यानंतर शिवसेनेचे विधान परिषदेतील दुसरे आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात अंबादास दानवे यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीच अंबादास दानवे यांच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थित केली आहे.

ज्या महायुतीच्या विरोधात विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपण लढलो त्याच महायुतीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोबत जाणे कितपत योग्य आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर अंबादास दानवे यांच्या निष्ठा तपासाव्या लागतील, असे म्हणत खैरे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT