

Sambhajinagar: 'आजचा दिवस माझा नसला, तरी उद्याचा दिवस नक्की माझा आहे. तोपर्यंत सोसावे लागेल, सहन करावे लागेल' अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील खासदार फुटीच्या संभाव्य शक्यतेवर भाष्य केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. शिवसेनेचे पाच खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्यभरात याचे पडसाद उमटत असले तरी मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा पक्ष हिंमतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बळीराजा ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला नसला तरी पक्षांतर्गत विरोध बाजूला सारून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे एकत्र आले होते. पक्ष फुटीनंतरही जिल्ह्यातील या दोन नेत्यांमधील मतभेद आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. विधान परिषदेची रिक्त झालेली स्वतःची जागा देत दानवे यांना दुसऱ्यांदा आमदार केले. सहाजिकच या मागे मराठवाड्यात पक्ष जिंवत ठेवणे हे प्रमुख कारण होते. सोबतच पक्ष फुटीच्या लाटेतही उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता एकनिष्ठ राहिलेल्या खैरे यांनाही नाराज करायचे नाही, या भूमिकेतून उद्धव ठाकरे यांनी खैरे यांनाही पक्षात तेवढाच सन्मान दिला.
उद्धव ठाकरे यांनी अनेकदा या दोन नेत्यामधील दुरावा दूर करण्याचे प्रयत्न केले. पण मातोश्रीच्या बाहेर पडले की खैरे-दानवे यांची तोंड पुन्हा विरुद्ध दिशेला असायची. याचा फटका जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला बसला. झेडपी, मनपा निवडणुकीत सर्वाधिकार अंबादास दानवे यांच्याकडे गेल्याने खैरे नाराज होते. त्यामुळे ते या निवडणुकीत अलिप्त राहिले. जिल्हा परिषदेत ठाकरेंच्या पक्षाचे ९ तर महापालिकेत ६ सदस्य आहेत. या तुटपुंज्या यशाचे श्रेय जसे अंबादास दानवे यांना जाते, तसे हे यशही त्यांचेच असल्याचे बोलले जाते.
विधान परिषदेच्या जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा एकदा अंबादास दानवे यांची रणनीती फोल ठरली. त्यांनी उमेदवारी दिलेल्या देवयानी डोणगांवकर यांनी माघार घेतल्याने गणेश लोखंडे या महापालिकेतील गटनेत्याला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करावे लागले. या सगळ्या घडामोडी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी दानवे यांनी भाजपाला मदत होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आर्थिक व्यवहाराचे आरोपही दानवे यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी केले होते.
परंतु उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर संधी देत मराठवाड्यातील शिवसेना जिंवत ठेवण्यासाठी बळ दिले. खैरे हे आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. मात्र दानवेंच्या आंदोलनापासून लांब राहणारे खैरे आता त्यांच्यासोबत रस्त्यावर दिसू लागले आहेत. भविष्यातही हे चित्र कायम राहिले, तर ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा उभारी घेणे शक्य होईल, असे बोलले जाते. आज खैरे-दानवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या बळी राजा ट्रॅक्टर रॅलीने पक्ष अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतो हा संदेश दोन्ही नेत्यांनी दिला आहे.
नको अटी - नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती अशा घोषणा देत निघालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ट्रॅक्टर रॅली विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकली. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्याऐवजी त्यांच्या आवाजाला दाबण्याचा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारने आज छत्रपती संभाजीनगरात प्रयत्न केला, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. बळीराजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा होता, असे पोलिसांच्या वागणुकीतून स्पष्टपणे दिसून आले, असा संताप खैरे-दानवे या नेत्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.