Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे भाजपाने या दोन्ही पदावर बिनविरोध विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल आमच्या सदस्यांना सत्तेत जायचंय म्हणत वेगळ्या समीकरणाचे संकेत दिले होते.
परंतु रात्रीतून घडलेल्या घडामोडीनंतर त्यांचे काही सदस्य भाजपाने फोडल्याचे समोर आले. शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि राष्ट्रवादी, अपक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेत भाजपाने बिनविरोधचे गणित जुळवून आणले.
ठाकरे गटाचा सत्तेत जाण्याचा गेम फसल्यानंतर अंबादास दानवे यांनी भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्यावर थेट आरोप करत खोक्यांच्या 'साव'लीत घेण्याचा 'अतुलनीय' प्रयत्न अशा शब्दात टीका केली. एरव्ही अपारंपरिक ऊर्जेची एजंटगिरी करताना दिसणारा रोहन कुलकर्णी नामक एक अधिकारी, काल भिवंडी बायपासला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिलेदार शोधत फिरत होता.
ईडी, खोके आणि आश्वासनांचे गारूड अशा अनेक गोष्टी त्यांच्या पोतडीत होत्या! दुसरीकडे, 30 खोक्यांचा विकास आणि तीन खोके अधिक देऊन त्याच्या साहेबांनी एका सदस्यावर 'प्रहार' केला, तर कोणाला आश्वासनांचे चॉकलेट देत तो फिरत होता. पक्ष म्हणून थेट बोलायचे नाही आणि केवळ सदस्य फोडत सुटायचे, हाच किळसवाणा प्रकार 'भाडोत्री' जनता पार्टी काल रात्रीही करत होती. त्यापेक्षा नको ती निवडणूक आणि नको ती जिल्हा परिषद, असा सूर अंबादास दानवे यांनी लावला.
भाजपाला सत्ता आणि पैशाची मस्ती आहे. विकास कामांना करोडो रूपये निधी देतो, असे सांगायचे तो द्यायचा नाही आणि वर आमिष दाखवायचे असा निर्लजपणा भाजपाचे नेते दाखवत आहेत. निवडून आलेल्या आमच्या सदस्यांना पहिल्या दिवशीपासून आर्थिक आमिष दाखवत होते. कालपर्यंत काय आज सकाळी पण आमचे सदस्य ज्या हाॅटेलमध्ये थांबले तिथे भाजपाचे नेते येऊन बसले होते.
भाजपाची निती ही धोकादायक, भयावह आहे. आमचे फक्त 9 सदस्य निवडून आलेले आहेत. आमच्याकडे बहुमत नाही, आम्ही संधी मिळाली तर कोणा बरोबर जाऊ शकतो असे आम्ही म्हटलं होतो. त्यामुळे आज आम्ही कोणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण भाजपाची निती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.