Amit Deshmukh, Manoj Jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh News : मनोज जरांगे लातूरात अन् इकडे सभागृहात अमित देशमुखांनी केली 'ही' मागणी..

Amit Deshmukh made this demand in Vidhan Sabha : 13 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर निघालेली मनोज जरांगे पाटील यांची शांतता संवाद रॅली आज लातूरात सुरू आहे.

Jagdish Pansare

Latur News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात शांतता संवाद दौरा करत मनोज जरांगे पाटील यांनी जनजागरण सुरु केले आहे. हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये लाखोच्या गर्दीत मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. येत्या 13 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर निघालेली मनोज जरांगे पाटील यांची शांतता संवाद रॅली आज लातूरात सुरू आहे.

मनोज जरांगे यांच्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज लातूरमध्ये रस्त्यावर उतरलेला असताना इकडे लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आणि त्यांच्या मागणीची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे हे विजयी झाले.

भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत महाविकास आघाडीने लातूरमध्ये दणदणीत विजय मिळवला. या विजयात मराठा आंदोलन आणि त्यावरून राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या रोषाचा महत्वाचा वाटा होता. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांना मराठा मतांचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आला होता.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लातूरमधील रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. इकडे लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील शांतता रॅली काढत असतांना अमित देशमुख यांनी सभागृहात सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधले. मराठा आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेला नाही. 13 जुलैपर्यंत तो पेच सोडवण्यात यावा, अशी मागणी करीत समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.

आज लातूर येथे ही रॅली होत असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सदरील रॅली व समाजाच्या मागण्याची माहिती मागून घ्यावी. शासनाने त्यावर गांभीर्याने विचार करून त्या संदर्भाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी भूमिका अमित देशमुख यांनी मांडली. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन सभागृहात आहेत, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन निवेदन करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील राज्यातील महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांवर आरोप करताना दिसत आहे. त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर अधिक असल्याचेही त्यांच्या विधानावरून दिसून आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध करत ओबीसी आरक्षण बचाव समितीनेही राज्यव्यापी संवाद दौरा करण्याचे नियोजन केले आहे. अनेक ठिकाणी मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सामजिक शांतता बिघडू न देता सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT