Chhatrapati Sambhajinagar : आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात सुरू झाला आहे. विशेषतः मराठवाड्यात याची तीव्रता अधिक पहायला मिळते. अशातच ओबीसी आरक्षण बचाव समितीचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी संभाजीनगर येथील बैठकीत केला.
राज्यातील शिंदे सरकार आणि मराठा आंदोलन नेते मनोज जरांग पाटील Manoj Jarange यांची मिलिभगत आहे. शिंदे सरकार हे ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून बेकायदेशीर कुणबी नोंदणी करत आहे. हा प्रकार त्यांनी वेळीच थांबविला पाहिजे. एकीकडे ओबीसीतील अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी सहा-सहा महिने वाट पहावी लागते. तर दुसरीकडे मराठा समाजातील लोकांना हातोहात दाखले देण्यात येत आहे, याकडेही प्रा. हाकेंनी लक्ष वेधले.
लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. मराठा समाजाने ओबीसीतूनच आरक्षणाचा हट्ट धरल्यामुळे ते सुध्दा आता धोक्यात आले आहे. आजघडीला ओबीसी शांत राहिला तर असलेले आरक्षण सुध्दा पळविले जाण्याची भीती आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आरक्षणाची लढाई लढत आहोत, त्यासाठी सरकारशी भिडत असल्याचे हाकेंनी स्पष्ट केले.
हाकेंनी, राजकीय व सामाजिक दृष्ट्या पुढारलेल्या मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. सगेसोयरे ही संकल्पना संवैधानिक नाही, अशाप्रकारे कुठल्याही कोर्टाचे जजमेंट सुध्दा उपलब्ध नाही. सुप्रीम कोर्ट यासह विविध आयोगांनी व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठणकावून सांगितले.
कोणतीही माहिती नसताना जरांगे व त्यांच्या सल्लागारांनी मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा डाव आखला आहे. तो मोडीत काढून आपले हक्क, अधिकारांच्या संरक्षणासाठी ओबीसी समाजाने एकजूट दाखवा, असे आवाहन हाके यांनी केले. मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा मनोज जरांगे करत आहेत. मंडल आयोग लागू होण्याचा इतिहास त्यांनी अगोदर पहावा. मंडल आयोग हा संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाज Maratha सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकला नाही. उगाच झुंडशाही करण्यात अर्थ नाही. आरक्षणाच्या लढाईत समोर मोठी ताकद आहे. पैसा, सत्ता त्यांच्याकडे असली, तरी आमच्याकडे जनता आहे. सर्व जातींची स्वतंत्र जनगणना व्हायला हवी. ओबीसी, एसटी, एससी या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हणत हाकेंनी मनोज जरांगे आणि सरकारवर टीका केली.
छोट्या छोट्या समाजावर हल्ले करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जातोय, हा प्रकार थांबला पाहिजे, अशी अपेक्षा नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली. सकल ओबीसी समाजच्या वतीने ओबीसी राज्यव्यापी संवाद दौरा लवकरच काढण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवारी संभाजीनगरात हाके, वाघमारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.