Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

NEET paper leak : नीट पेपर फुटीप्रकरणी अमित देशमुखांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'एनटीए जबाबदार, त्यांनी आत्मपरीक्षण करावे'

Latur education crisis News : विरोधकांनी पेपर फुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर आणि काँग्रेसशी त्याची असलेली जवळीक यावरून टीका सुरू केली आहे.

Jagdish Pansare

Latur News : नीट पेपर फुटीच्या प्रकरणाचे थेट कनेक्शन लातूरमध्ये निघाले. एक प्राध्यापक, एक संस्थाचालक या प्रकरणात अटकेत आहेत. पेपर फुटी प्रकरणानंतर नव्याने नीटची परीक्षा घेण्यात येणार असल्याने लातूरमध्ये तणावातून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विरोधकांनी पेपर फुटी प्रकरणात अटक झालेल्या शिवराज मोटेगावकर आणि काँग्रेसशी त्याची असलेली जवळीक यावरून टीका सुरू केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लातूरमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक व इतर व्यवसायिकांमध्ये असलेल्या भितीचे वातावरण दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूरमध्ये चिंतन बैठक घेण्यात आली. आमदार अमित देशमुख यांनी या बैठकीत नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीए जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला या बैठकीत दिला.

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर लातूर पॅटर्नशी निगडित विद्यार्थी, पालक, शिक्षक प्राध्यापक व इतर व्यावसायिक घटकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या परिस्थितीत चिंतन करून चर्चेतून विद्यार्थी, पालकांच्या मनातील भिती घालवण्यासाठी उद्योगभवन परिसरातील गणेश हॉल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने चिंतन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, ट्युशन क्लास, वस्तीगृहे, झेरॉक्स व पुस्तक दुकाने, अभ्यासिका यांचे चालक व मालक तसेच इतर संबंधित घटकांशी अमित देशंमुख यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

लातूर पॅटर्न हा विद्यार्थी, शिक्षक, पालक, व संस्थाचालक यासारख्या घटकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक घडवलेला आहे, यात एखाद्याने चूक केली म्हणून या पॅटर्नच्या लौकिकाला धक्का लागला आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. नीट पेपर फुटी प्रकरणाची चौकशी सुरू आहे, हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य न करता, यात जे कोणी दोषी असतील त्यांना कायद्याने कडक शिक्षा होईल, असा विश्वास, अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

'लातूरच्या लौकिकाला धक्का पोहोचेल,अशी वक्तव्य करू नयेत'

लातूरमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रमाणिक आणि कष्टाळू आहेत, या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा रद्द झाली आणि पुनर्परीक्षा होणार म्हणून घाबरण्याचे कारण नाही, त्यांनी शांत राहून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे त्यांना नक्कीच यश मिळणार आहे. निवडणुकीच्या मर्यादेत राजकारण आणि त्यानंतर समाजकारण ही लातूरची संस्कृती आहे, ती संस्कृती सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळांनी जपण्याची येथे परंपरा आहे. तत्कालीक राजकीय फायद्यासाठी लातूरच्या लौकिकाला धक्का पोहोचेल ,अशी वक्तव्य कोणीही करू नयेत, असा टोलाही अमित देशमुख यांनी विरोधकांना लगावला.

उद्योग भवन असेल किंवा शहरातला इतर कुठलाही भाग असेल, तेथे व्यावसायिक किंवा नागरिकांकडून कांही अनियमितता घडल्या असतील, तर शासकीय यंत्रणांनी त्या दुरुस्त करून घ्याव्यात. त्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नये, कायद्याच्या चौकटीत आणि नियमाप्रमाणे व्यवसाय, उद्योग करणाऱ्यांना कुठल्याही यंत्रणेने विनाकारण त्रास दिल्यास ते प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. लातूर हे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेले आहे, या केंद्राचा अधिक विस्तार व्हावा म्हणून या ठिकाणी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत.

शहराच्या सर्वच भागात शैक्षणिक सुविधांसोबत सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे. लातूर येथे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवण्याची इच्छा बाळगून असलेल्या लातूर जिल्ह्याबाहेरील पालकांनी निर्धास्त राहून त्यांना येथे पाठवावे, त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला कोणतीही बाधा पोचणार नाही, याची काळजी प्रत्येक लातूरकर घेईल, असा विश्वास अमित देशमुख यांनी उपस्थितांना दिला. लातूर हे शांत, सुरक्षित, सामाजिक एकोपा जोपासणारे, सकारात्मक विचाराचे शहर आहे, या शहराचे हे वैशिष्ट्य कायमपणाने जपले जाईल, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT