Latur Political News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख विरुद्ध भाजपाचे निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. संधी मिळेल तेव्हा दोघेही एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करतात. आपापल्या मंत्रिपदाच्या काळात लातूर जिल्ह्याचा विकास कसा केला? हे सांगण्याची स्पर्धा या दोघांमध्ये नेहमीच लागलेली दिसते. तर इतक्या वर्षात तुम्ही लातूर साठी काय केले? असा नेहमीचा प्रश्नही दोघे एकमेकांना विचारतात.
वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण करणाऱ्या अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) यांच्यातील मैत्रीच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या राजकारणात झडू लागल्या आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांचा काल वाढदिवस होता, यानिमित्ताने अमित देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. 'महाराष्ट्राचे माजी मंत्री निलंगा विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छांसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' अशा मोजक्या शब्दात अमित देशमुख यांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महिनाभरापूर्वी लातूर शहरात झालेल्या एका खाजगी कार्यक्रमात अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि संभाजी पाटील निलंगेकर एकाच व्यासपीठावर दिसले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांचाही विजय अगदी काठावर झाला. याचा संदर्भ देत दोघांनी आपापल्या भाषणात एकमेकांना चिमटे काढले होते. हमदर्द आता हमदोस्त व्हायला हरकत नाही, अशी साद दोघांनी एकमेकांना घातली. लातूरच्या विकासासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून मी आणि संभाजी पाटील निलंगेकर एकत्र काम करायला तयार आहोत, अशी ग्वाही अमित देशमुख यांनी दिली होती.
राजकारण आमचं निवडणुकीपुरतं असतं निवडणुका संपल्या की आम्ही एकमेकांचे मित्र असतो ,असेही अमित देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत लातूर पेक्षा जास्त लक्ष निलंगाकडे होते आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचे लक्ष त्यांच्या मतदारसंघापेक्षा लातूरकडे अधिक होते त्याचा परिणाम काय झाला? हे निकालानंतर दिसूनच आले असा, टोलाही अमित देशमुख यांनी तेव्हा लगावला होता. त्यामुळे आम्ही दोघे हमदर्द आहोत, आता हे दोन हमदोस्त कसे होतील? यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे, असे सांगत अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यापुढे मैत्रीचा हात केला होता.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने अमित देशमुख यांनी लातूरमध्ये तयारी सुरू केली आहे. नागरी प्रश्नांसह कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भेटीगाठी घेत रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि शहरातील वाढते गुन्हेगारी यावर देशमुख सध्या काम करताना दिसत आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये संघटनात्मक बांधणी होऊन लातूर शहर आणि ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती दोन आठवड्यांपूर्वी झाली.
त्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत माजी मंत्री बसवराज पाटील, लातूरचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासोबत जिल्ह्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. त्यानंतर भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी झपाटून कामाला लागेल, असे चित्र होते. मात्र पत्रकार परिषद संपली आणि पुन्हा जिल्ह्यातील या नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हमदर्द हमदोस्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.