Latur News : लातूर शहरातील शिकवणी वर्ग चालणाऱ्या भागात अमली पदार्थ विकणारे रॅकेट सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, आता या तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न राज्यात आणि संपूर्ण देशात प्रसिद्ध असल्यामुळे लाखोच्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात, या शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राहिल्यामुळे लातूरमध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक निश्चिंत असतात. मात्र आता सगळ्यांनाच दक्ष राहण्याची गरज असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
शिक्षणातील लातूरचा (Latur) पॅटर्न संपूर्ण राज्यात ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षात शहर आणि जिल्ह्यामध्ये खून, चोऱ्या, अंमली पदार्थांची सर्रास विक्री अशा घटनांनी हा लातूर पॅटर्न धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसापुर्वी लातूरच्या मध्यवस्ती भागात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका महिलेसह काही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा लातूर जिल्हा हादरून गेला. लातूर शहर मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आणि शांत सुरक्षित शहर या लौकिकाला धक्का देणाऱ्या घटना मागच्या काही दिवसात उघड झाल्या आहेत, वैद्यकीय महाविद्यालये, इतर काही शाळा महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेसची वस्तीगृहे, यांच्या नजीकच्या ठिकाणी नशिल्या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती आता पुढे येत आहे. (Amit Deshmukh) अशा गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी अत्यंत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
संबंधितांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत, शिक्षण संस्था चालक, प्राचार्य, डीन, शिक्षक , वस्तीगृहांचे मालक आणि पालकांनीही दक्ष राहून खबरदारी घेणे आता अनिवार्य बनले, असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे. लातूरमध्ये ड्रग्स तस्करीचे प्रमाण वाढले असून दोन दिवसापुर्वी सुतमील रोड परिसरातील एका पाणीपुरी स्टॉलच्या शेजारी कोणीतरी ड्रग्स पावडरची खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ड्रग्सची विक्री आणि खरेदी करणाऱ्या तीन जणांना बेड्या ठोकल्या.ड्रग विक्री करणारी महिला आणि खरेदी करणारे दोन तरुणांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. माया अनुप सोनवणे या महिलेकडून ऋषिकेश राठोड आणि बिदर रोड उदगीर येथील संयम पडिले हे दोन तरुण ड्रग्ज खरेदीसाठी आले असताना पोलिसांनी सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने लातूरमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यावर माजी आमदार धीरज देशमुख यांनी चिंता व्यक्त करत विद्यार्थी आणि तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार अमित देशमुख यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त करत राज्य सरकार, पोलीस, जिल्हा प्रशासन तसेच शैक्षणिक संस्था, खाजगी संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यार्थी पालक यांनाही दक्ष राहण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.