Amit Shah News Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah In Marathwada News : अमित शाह, फडणवीस यांचा मराठवाडा दौरा भाजपला `अच्छे दिन` आणेल का ?

Jagdish Pansare

Marathwada BJP Political News : भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे देशातील क्रमांक दोनचे नेते अमित शाह येत्या 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्याची सगळी फौज त्यांच्यासोबत असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मराठवाडाच्या निकालाने महायुतीला विशेषतः भाजपला `जोर का झटका` बसला आहे.

महाराष्ट्रातील मिशन-45 ची मदार असलेल्या मराठवाड्याने भाजपला (BJP) हात दाखवल्याने हे मिशन फेल झाले. लोकसभेच्या आठ पैकी सात जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. यात सर्वाधिक चार जागावर भाजपच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे या सगळ्यांनाच महाविकास आघाडीने धूळ चारली. छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीने जिंकली ती ही शिवसेना शिंदे गटाच्या खिशात गेली. त्या अर्थाने मराठवाड्यात भाजपला महाविकास आघाडीने व्हाईट वाॅशच दिला.

दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने आधी शिवसेना आणि सत्तांतरानंतर राष्ट्रादी काँग्रेस पक्ष फोडला. फोडाफोडीचे राजकारण, गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षांतर्गत वाढलेली नाराजी आणि मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यात चिघळलेले वातावरण यावर भाजपच्या चाणक्यांना मार्ग काढता आला नाही. परिणामी मराठवाड्यातील सामना महाविकास आघाडीने सात विरुद्ध एक असा मोठ्या फरकाने जिंकला.

विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती नको, यासाठी अमित शाह (Amit Shah) यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. 24 सप्टेंबर रोजी शहा हे फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांसोबत मराठवाड्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात महायुतीतील कुठल्या पक्षाला सर्वाधिक नुकसान झाले याचा लेखाजोखा समोर ठेवूनच जागा वाटपावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्याविरोधात महाविकास आघाडी, तिसरी आघाडी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय असले ? यावरही बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याने साथ न दिल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेली आहे. शहा, फडणवीस आपल्या पक्षाला पुन्हा फ्रंटफुटवर आणण्याचा प्रयत्न आपल्या दौऱ्यातून करणार आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे. मराठवाड्यात ती अधिक प्रमाणात पहायला मिळते. निवडणुकीआधी ती वेळीच दूर करुन भाजप पुन्हा मराठवाड्यावर आपली पकड मिळवू पाहत आहे. यात भाजपला कितपत यश मिळते? हे विधानसभा निवडणुकीतील निकालानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास अमित शाह यांच्या मरावाडा दौऱ्यासाठी महायुतीचे नेते जोरात तयारीला लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT