Amit Shah-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve Birthday : अमित शाहांकडून दानवेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् रिटर्न गिफ्टही मागितले....

Amit Shah Phone Call to Danve : रावसाहेब दानवेंना अडचणीत आणू पाहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनाही रावसाहेब दानवे भला आदमी है असे म्हणत अमित शाह त्यांची बाजू घ्यायचे. अशा या ‘भल्या आदमी’ला शाह यांच्याकडून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खास ठरल्या.

Tushar Patil

Bhokardan, 19 March : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस सोमवारी (ता. १८ मार्च) साजरा झाला. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना सहाव्यांदा जालन्यातून उमेदवारी जाहीर केल्याने या वाढदिवसाच्या उत्साहात भरच पडली. सकाळपासून रावसाहेब दानवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भोकरदन, जालना येथील निवासस्थानी समर्थकांनी रांगा लावल्या होत्या. सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटून रावसाहेब दानवे यांचे अभीष्टचिंतन करण्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

या सर्वांमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना शुभेच्छा देण्यासाठी एक खास फोन आला. तो फोन होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा. कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या दानवेंना अमित शाह यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाच दानवेंकडे लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळीपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होण्याचे रिटर्न गिफ्टही मागितले. अमित शाह आणि रावसाहेब दानवे यांचे चांगले संबंध आहेत. जेव्हा जेव्हा रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण शैलीतील एखाद्या विधानामुळे अडचणीत सापडले, तेव्हा तेव्हा शाह यांनी त्यांची पाठराखण केल्याची उदाहरणे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवेंना अडचणीत आणू पाहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनाही रावसाहेब दानवे भला आदमी है असे म्हणत अमित शाह त्यांची बाजू घ्यायचे. अशा या ‘भल्या आदमी’ला शाह यांच्याकडून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खास ठरल्या. 18 मार्च रोजीचा रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आचारसंहितेमुळे धूमधडाक्यात जरी साजरा करता आला नसला तरी त्यातील उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. राजुरेश्वराचे दर्शन घेत संपूर्ण दिवस आणि रात्री उशिरापर्यंत दानवे गावागावांत लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.

अमित शाह यांनी फोन करून दानवे जी आपको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनांए म्हणत शुभेच्छा दिल्या. दानवेंनीही शाह यांना धन्यवाद आपका आशीर्वाद कायम है, म्हणत आभार व्यक्त केले. पण, अमित शाह नुसते शुभेच्छा देऊन थांबले नाहीत, इस बार ज्यादा व्हाेटो से चुनके आना है! असे आश्वासनही दानवेंकडून घेतले. इस बार वातावरण अच्छा है ना? अशी विचारणा करत शाह यांनी कानोसाही घेतला. यावर चांगलं वातावरण आहे, असे सांगत दानवे यांनी शाह यांना मोठ्या विजयाची खात्री दिली.

भाजपने या वेळी ‘अब की बार चारसाै पार’चा नारा दिला आहे, तर राज्यात मिशन-45 चे टार्गेट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले आहेत. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना त्यांच्या विजयाची खात्री असल्यानेच सहाव्यांदा उमेदवारी दिल्याचे बोलले जाते.

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात रावसाहेब दानवे यांना केंद्रात राज्य मंत्रिपद व लगेचच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात भाजपला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते. तेव्हापासून अमित शाह यांच्या मनात दानवेंची चांगली प्रतिमा निर्माण झाली. नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांचा 'मेरे मित्र' असा उल्लेख करत दानवे यांच्या प्रतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

अमित शाह यांचा दानवेंवर चांगलाच वरदहस्त आजही कायम असल्याचे त्यांनी वाढदिवसानिमित्त आवर्जून केलेल्या फोनवरून स्पष्ट होते. शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच दानवे यांच्याकडून विजयाचे रिटर्न गिफ्ट मागितल्याची चर्चा यानिमित्ताने मतदारसंघात होताना दिसत आहे. दानवेंना अमित शाह यांचा आलेला फोन व त्याचे रेकॉर्डिंग मतदारसंघातील कार्यकर्ते बुलेट ट्रेनप्रमाणे व्हायरल करीत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT