Mumbai, 19 March : ‘लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी-शाहांचे वस्त्रहरण करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर वाटाघाटी करत आहेत. मात्र, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतरही राज ठाकरेंची गरज भाजपला का भासत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शिंदे-पवारांची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा प्रयत्न यातून होत आहे का, अशीही चर्चा रंगली आहे.
ठाकरेंची शिवसेना फोडून, माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना धक्क्यांवर धक्के दिल्यानंतरही सत्ताधारी भाजपने आता राज ठाकरेंच्या मनसेचे 'इंजिन'ही आपल्या यार्डात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज ठाकरे हे भाजपला साथ देऊन लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याकरिताच्या वाटाघाटींसाठी राज हे दिल्लीत पोचले आहेत, त्यानंतरच्या १५ तासांत काही गुप्त बैठका, चर्चा झाल्या आणि राज हे भाजपसोबत राहणार असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत राज यांच्या पक्षाला मुंबईत एक किंवा दोन जागा मिळू शकतात. मात्र, त्यावर अजूनही खल सुरू आहे. मात्र, राज हे आता भाजपच्या प्रचारासाठी सभा गाजवणार, हे नक्की आहे.
ठाकरे-पवारांकडील मातब्बर नेते फोडल्यानंतरही ते भाजप आणि मित्रपक्षाच्या नाकीनऊ आणत असल्याचे अनेक सर्व्हेतून पुढे आलेले आहे. मात्र, भाजपने त्यावर रामबाण उपाय म्हणून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्याकडे खेचून ठाकरे आणि पवारांना त्यांच्याच भाषेत आणि तशाच स्टाइलमध्ये उत्तर देण्याची रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपसोबत (BJP) नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर एकत्र यायचे, जागावाटप, त्या बदल्यात राज यांचा वापर कसा होणार, तो कुठे होणार, विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित कसे असणार, यावर अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी राज यांची दिल्लीत भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. त्यामुळे भाजप-मनसे हे नवे समीकरण 'परफेक्ट' असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, महायुतीमधील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे का, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण, जेव्हा शिंदे आणि भाजपचे सरकार सुरळीत सुरू होते. सरकारकडे दीडशेपेक्षा जास्त आमदार होते. त्यानंतरही अजित पवार यांना सोबत घेण्यात आले. त्यावेळी शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता तर महायुतीमध्ये चौथा भिडू येत आहे, त्यामुळे राज ठाकरेंसारखा नेता सोबत घेऊन शिंदे पवारांची जागावाटपामधील बार्गेनिंग पावर कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.