Crime News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena V/s BJP News : नांंदेड जिल्हा हादरला; फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं अपहरण करत बोटे छाटली

Jagdish Pansare

Nanded Political News : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये संघर्षाचे प्रसंग उद्भवत असून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे अपहरण करून बोटे छाटण्यात आल्याचा हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. हल्ला करणारे भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोहा-कंधार बंदचा इशारा दिली आहे.

लोहा येथील शिवसेनेच्या (Shivsena UBT) पदाधिकाऱ्याने फेसबुकवर वादगस्त पोस्ट टाकली होती. यामुळे संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्याचे अपहरण करण्यात आले, एवढेच नाही तर त्याला जबर मारहाण करत बोटे छाटण्यात आल्याचा भयनाक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यानंतर तालुक्यात तणावाचे वातावरण असून हल्लोखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी रात्री हा भयंकर प्रकार घडल्याचे समजते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आणि नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा शिवारातील एका धाब्यावरून वडवळे यांचे काहीजणांनी अपहरण केले. अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर वडवळ यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लोखोर एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी वडवळे यांची दोन बोटे छाटली.

या हल्ल्याची माहिती मिळताच वडवळे यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. (Nanded) सदरील मारहाण भाजप कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप कुटुंबीय आणि शिवसैनिकांनी केला आहे. दरम्यान, आरोपींना अटक केली नाही तर लोहा - कंधार बंद करू असा इशारा उबाठा कडून देण्यात आला.

काय आहे प्रकरण

लोहा येथील उबाठाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल रात्री वडवळे यांचे अपहरण केले. एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. दारूची बाटली डोक्यावर ठेवून वडवळे यांना नाचायला लावले. त्यांना पोस्टबद्दल माफी मागायला लावली.

नांदेडचं पार्सल चिखलीला आलं, लोह्याचं पार्सल चिखलीला पाठवायचं, अशा आशयाची पोस्ट संबंधित पदाधिकाऱ्याने केली होती. याशिवाय काही आक्षेपार्ह पोस्ट त्यांच्याकडून करण्यात आल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लोहा-कंधारमध्ये भाजपची दादागिरी वाढल्याचा आरोप `उबाठा` कडून करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT