BJP corporator Anil Makariye files nomination for Standing Committee Chairman in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after missing out on the mayor post. Sarkarnama
मराठवाडा

BJP News : संभाजीनगरच्या महापौरपदाची तहान 'स्थायी समिती सभापती' पदावर भागली; अनिल मकरिये यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Committee Chairman Election : संभाजीनगर महापालिकेत महापौरपद हुकल्यानंतर भाजपने नगरसेवक अनिल मकरिये यांना स्थायी समिती सभापतीपदासाठी उमेदवारी दिली असून बहुमतामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची शतप्रतिशत सत्ता आली. स्वबळावर लढलेल्या भाजपाने 57 नगरसेवक निवडून आणत बहुमताला गवसणी घातली. शिवसेनेसोबतच्या युतीत कायम बॅकसीटवर असलेल्या भाजपाला प्रथमच फ्रंट सीटवर बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे महापौर पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. त्यात नगरसेवक अनिल मकरिये यांचेही नाव आघाडीवर होते.

पण समीर राजूरकर यांनी बाजी मारली. आता मकरिये यांना स्थायी समिती सभापती पदाची उमेदवारी देत भाजपाने त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. स्थायी समिती सभापती म्हणून मकरिये यांच्या हाती महापालिकेच्या तिजोरीची चावी असणार आहेत. मात्र, महापौर पदाची तहान स्थायी समितीवर भागवावी लागली, याचे शल्य मकरिये यांच्या मनात नक्कीच असणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी अपेक्षेनुसार भाजपने अनिल मकरिये यांना संधी दिली आहे. बुधवारी (ता.11) दुपारी त्यांनी अर्ज दाखल केला. गुरूवारी (ता.12), सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापतीसह इतर पाच समिती सभापतींसाठी निवडणुक होणार आहे. मकरिये यांच्या विरोधात एमआयएम पक्षाने खान अब्दुल मतीन यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच समित्यांमध्ये भाजपचे वर्चस्व असले तरी युतीधर्म म्हणून शिवसेनेला एक समिती मिळणार आहे.

महापौरपदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक झाल्यानंतर स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता लागली होती. महापौरपद हुकल्यानंतर अनिल मकरिये यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत होते. त्यानुसार पक्षाने बुधवारी (ता.11) त्यांना उमेवारी जाहीर केली. स्थायी समितीत भाजपचे बहुमत असून, तब्बल आठ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान उमेदवारीची घोषणा होताच दुपारी भाजप, शिवसेना युतीचे नगरसेवक, नगरसेविका महापालिकेत दाखल झाले. उमेदवार मकरिये यांचा अर्ज नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात आला. मकरिये यांच्या विरोधात एमआयएम पक्षाने खान अब्दुल मतीन यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीपूर्वीच दालनाची पाहणी

स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज भरल्यानंतर मकरिये यांनी दालनाची पाहणी केली. सभापतिपदासाठीच्या दालनाचे काम सध्या सुरू आहे. मकरिये यांच्या पाहणीत काम संथ गतीने सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. या दालनाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करा, अशी सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना केली.

दरम्यान, भाजपने शहरातील समर्थनगर या एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांना मोठ्या पदावर पहिल्याच वर्षी संधी दिली आहे. महापौरपदी समीर राजूरकर यांना संधी मिळाल्यानंतर नवीन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको-हडकोमधील एखाद्या नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीसारखे महत्वाचे पद मिळेल, अशी अपेक्षा होती, पण मंत्री अतुल सावे यांच्या जवळचे असलेल्या मकरिये यांना संधी देण्यात आली. यामुळे काही नगरसेवकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT