

Panchayat Samitee News : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली होती. त्यामुळे सहाजिकच पंचायत समिती सभापती, उपसभापति निवडणुकीतही याच पक्षाचे वर्चस्व राहिले. सर्वाधिक सभापती करत भाजपाने जिल्ह्यात आम्हीच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.
सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार वगळता वैजापूरचे बोरनारे, पैठणचे भुमरे, कन्नडच्या संजना जाधव या आमदारांनी आपल्या मतदारसंघात सभापती करत आपली ताकद दाखवून दिली. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीत भाजपाचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य आपल्या बाजूने घेत दणका दिला.
अंबादास दानवे यांनी पंचायत समिती परिसरातच त्यांची गचांडी धरून त्यांना जाब विचारल्याने एकच खळबळ उडाली. पण शेवटी भाजपाच्या कल्याण गायकवाड यांनी बाजी मारत सभापती पद पटकावलेच. गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समिती राखली, तर फुलंब्रीमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांनी राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपाचा सभापती व राष्ट्रवादीचा उपसभापति करत युती धर्म पाळला.
खुलताबाद पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या सुनीता संजय खंडागळे तर उपसभापती पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंदाताई बद्रीनाथ वाकळे यांची निवड झाली. तर गंगापूर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता येऊन सभापतीपदी भाजपाच्या कविता रवींद्र चव्हाण तर उपसभापती पदी शिवसेनेचे राजेश्वर हिवाळे यांची निवड झाली. फुलंब्री पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सर्जेराव मेटे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी अजिनाथ सोनवणे यांची निवड झाली.
पैठणमध्ये खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे या पित्रा पुत्राच्या जोडीने आपले वर्चस्वर पुन्हा एकदा सिद्ध केले. पैठण पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या वैशाली विनोद बोंबले पाटील तर उपसभापती पदी संजय लघाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वैजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी सभापती व उपसभापती दोन्ही पद आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले. वैजापूर पंचायत समितीवर सभापतीपदी वंदना बाळासाहेब शिंदे तर उपसभापती पदी सोनाली किशोर जाधव यांची निवड झाली. तर कन्नड पंचायत समितीमध्ये भाजपाला सोबत घेत आमदार संजना जाधव यांनी सभापती पद आपल्याकडे घेत भाजपाचा उपसभापती केला. कन्नड पंचायत समितीच्या सभापती पदी सुप्रिया अनिलकुमार घुगे तर उपसभापती पदी मायाताई ललित सुरासे यांनी विजयाचा गुलाल उधळला.
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडीवरून चांगलाच राडा झाला. भाजपाचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य पळवल्याने त्यांना अंबादास दानवे यांच्या रोषाला समोरे जावे लागले. दानवे यांनी गायकवाड यांची काॅलर पकडत त्यांना चापड मारल्याचे बोलले जाते. या राड्यानंतरही कल्याण गायकवाड यांनी सभपाती पदाला गवसणी घातलीच. तर उपसभापती पद शिवसेनेच्या बाळासाहेब गाडे यांना मिळाले.
नगपालिका, जिल्हा परिषद गटात बाजी मारत तालुक्यात आपलाच आवाज चालतो हे सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या अब्दुल सत्तार यांना सोयगाव-सिल्लोड या दोन्ही पंचायत समितीमध्ये धक्का बसला. या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये भाजपाने आपला सभापती बसवला. सोयगावमध्ये सत्तारांना बाजूला ठवेत शिवसेनेच्या कन्नड-सोयगावच्या आमदार संजना जाधव यांच्या एका सदस्याची मदत भाजपाने घेतली. तिथे भाजपाचे उत्तम चव्हाण सभापती तर उपसभापति पदी शिवसेनेच्या गयाबाई घोडे हे विराजमान झाले.
तर सिल्लोडमध्ये सभापती आणि उपसभापति ही दोन्ही पदे भाजपने बहुमताच्या जोरावर आपल्याकडे राखली. इथे भाजपाच्या अनिता सुरेश बनकर यांची सभापतीपदी, तर भगवान आहेर यांची उपसभापती निवड करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.