Dharashiv News Sarkarnama
मराठवाडा

Omerga Congress : काँग्रेस बदल रही है !, उमरग्याची धुरा सगर अन् औरादेंकडे

Congress News : उमरगा तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे.

Rashmi Mane

अविनाश काळे

Omerga News : उमरगा तालुक्यात काँग्रेस पक्षाने कात टाकायला सुरुवात केली आहे. माजी राज्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणूक समन्वय समितीत निवड झाली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आता उमरगा शहर काँग्रेसची धुरा तरुणांच्या हाती सोपवण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी अनिल ऊर्फ पप्पू सगर, कार्याध्य़क्षपदी अभिषेक औरादे यांची निवड करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मरगळ दूर करण्यासाठी...

उमरगा तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. असे असतानाही शहराध्यक्षपद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त होते. त्यामुळे पक्ष संघटनेत एक प्रकारची मरगळ आली होती. संघटन मजबूत करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून सुरू होती. उमरगा तालुक्यात काँग्रेसची मजबूत पायाभरणी करण्यात आली. मात्र, हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसच्या बुरुजाला हादरे बसत गेले. प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून दिले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. सध्या साखर कारखान्यांची स्पर्धा आहे अतिरिक्त उसाच्या काळात पाटील यांच्या विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा आधार मिळाला. औसा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी तेथील मतदारांनी पाटील यांना दिली. त्यांनी बंद पडलेला किल्लारी साखर कारखाना सुरू केला होता. तिसऱ्या वेळी मात्र औशातून त्यांचा पराभव झाला. असे असले तरी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत महत्त्वाची पदे दिली.

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदावर यापूर्वी दिग्गजांनी काम केले आहे. दिवंगत शिवाजीराव चालुक्य, स्वर्गीय सुरेश पाटील, बलभीमराव पाटील, केशव पवार यांना तालुकाध्यक्षपदाची संधी मिळाली. सध्या अ‍ॅड. सुभाष राजोळे या पदावर आहेत. दरम्यान, वामनराव सूर्यवंशी प्रदीर्घ काळ शहराध्यक्ष होते. दीड - दोन वर्षांपासून शहराध्यक्ष पद रिक्त होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांची या पदावर निवड करण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार सगर आणि औरादे या तरुणांना संधी मिळाली आहे. मुरुम (ता. उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते दोघांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, माजी नगरसेवक विजय दळगडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष याकूबभाई लदाफ, ज्ञानेश्वर पाटील, सचिन सगर, अनुज सगर, सुनील सगर आदी उपस्थित होते.

शहरात काँग्रेस मजबूत असली तरी गेली तीन टर्म शिवसेनेचे आमदार निवडून येत आहेत. यापूर्वीचे पदाधिकारी प्रस्थापित होते. काळ बदलला मात्र त्यांची काम करण्याची पद्धत फारशी बदलली नव्हती. आता अनिल सगर आणि अभिषेक औरादे यांच्या निवडीने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या या दोन्ही तरुणांच्या स्वभावाचा पक्षसंघटना बांधणीत उपयोग होण्याची आशा कार्यकर्त्यांना आहे.

Edited by Rashmi Mane

SCROLL FOR NEXT