Shivsena UBT Leader Bhaskar Ambekar Join Shivsena News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Bhaskar Ambekar Join Shivsena : 'माझी निष्ठा वांझोटी ठरली' उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत!

Jalna Municipal Corporation Election 2025 : कुठलेही पद किंवा आमदारकी पाहिजे म्हणून मी पक्ष सोडत नाहीये. परंतु मान, सन्मान मिळत नसेल आणि लाचारी पत्करावी लागत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे.

Jagdish Pansare

  1. जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, कारण जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  2. हा डाव अर्जुन खोतकरांनी आखला असून स्थानिक राजकारणात शिंदे गटाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

  3. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंच्या गटातील असंतोष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Jalna Municipal Corporation News : गेली 39 वर्ष शिवसेनेत निष्ठेने काम करणारे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये युती तुटली तेव्हा भाजपकडून विधानसभेची उमेदवारी ऑफर करण्यात आली होती ती नाकारली. शिवसेनेत बंड झाले तेव्हाही मला पक्षात येण्याची ऑफर होती. परंतु मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरच्या निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिलो. परंतु माझी ही निष्ठा वांझोटी ठरली, अशी खंत व्यक्त करत भास्कर आंबेकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला.

1990 पासून मी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागत होतो. प्रत्येक वेळी मला डावलण्यात आले तरी पक्षादेश शिरसावंद मनात मी निष्ठेने पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम केले. 2004 मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. सगळ्या जिल्ह्यात याची चर्चा झाली आणि अचानक मी नगराध्यक्ष असल्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर आपली सत्ता जाईल, म्हणून ऐनवेळी अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली. तेव्हाही मी नाराज झालो नाही आणि पक्षाचे काम करत दिलेल्या उमेदवाराला निवडून आणले.

2009 मध्ये पुन्हा पक्षाने माझी कुठलीही तयारी नसताना मला जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा घाट घातला. अर्जुन खोतकर हे घनसावंगीतून तयारी करत असल्यामुळे नाईलाजास्तव मला उमेदवारी देऊ केली. मीही पक्षाचा आदेश म्हणून लढलो आणि 58 हजार मते घेतली. पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवले. मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवले पण माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा कधीच विचार केला नाही.

कुठलेही पद किंवा आमदारकी पाहिजे म्हणून मी पक्ष सोडत नाहीये. परंतु मान, सन्मान मिळत नसेल आणि लाचारी पत्करावी लागत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा विचार करून मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारकी किंवा पद मिळावे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. तसे असते तर 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हाच त्यांनी मला सोबत येण्यासाठी गळ घातली होती. संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी ते माझ्यावर सोपवणार होते. परंतु मी बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाची साथ कधीच सोडणार नाही,असे ठणकावून सांगितले.

भाजपकडून उमेदवारीची आॅफर

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा भाजपचे नेते रावसाहेब दानवे माझ्या घरी आले होते. विधानसभेची उमेदवारी आणि निवडणुकीचा सगळा खर्च करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. परंतु त्यावेळीही मी पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले. भविष्यात आलेल्या अशा अनेक संधी मी सोडल्या, परंतु माझी निष्ठा पक्ष नेतृत्वाच्या दृष्टीने वांझोटी ठरली.

मी आजारी असताना तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून तब्येतीची चौकशी केली. एवढेच नाही तर मी तुम्हाला भेटायला येतो असे सांगितले. खरं तर मी त्यांच्यासोबत गेलो नाही याचा राग किंवा नाराजी त्यांची माझ्यावर असायला हवी. होती परंतु पक्षभेद विसरून त्यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. ज्या पक्षात निष्ठेने राहिलो त्या पक्षाचे नेत्यांनी मात्र आजारपणातही माझी चौकशी केली नाही. बऱ्याच दिवसांनी आमचे नेते विनोद घोसाळकर हे माझ्या घरी आले होते, अशी खंत भास्कर आंबेकर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन आले. परंतु आता त्याचा फारसा उपयोग नाही, माझा निर्णय पक्का आहे. कुठलेही पद किंवा शब्द दिला म्हणून मी पक्ष सोडत नाहीये. परंतु आता लाचारी नको स्वाभिमान आणि मानसन्मान हवा या भूमिकेतूनच मी हा निर्णय घेतल्याचे भास्कर आंबेकर यांनी सांगितले. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या ती पार्श्वभूमीवर भास्कर आंबेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

खोतकरांनी डाव टाकला

महाविद्यालयीन जीवनापासून सोबत काम करणारे आमदार अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर यांच्यात नजीकच्या काळात भेटीगाठी वाढल्या होत्या. त्याचा परिणाम आंबेकर यांच्या शिवसेनाप्रवेशातून दिसून येत आहे आंबेकर यांच्या पक्षप्रवेशाने चालण्यात शिवसेनेची ताकद आहे अधिकच वाढणार आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश करत अर्जुन खोतकर यांनाच आव्हान दिल्यानंतर त्याला चेक देण्याचा प्रयत्न खोतकर यांनी भास्कर आंबेकर यांना पक्षात घेत केला आहे.

महापालिकेत पहिला महापौर बसवण्याची स्पर्धा महायुतीतील घटक पक्षांमध्येच लागली असताना भास्कर आंबेकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे पारडे काहीशी जड होणार आहे. अर्जुन खोतकर यांनी भाजपकडे महापालिका निवडणुकीसाठी प्रस्ताव देऊन दोन आठवडे झाले आहेत मात्र भाजपने अद्याप त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अर्जुन खोतकर यांनी अडीच अडीच वर्ष महापौर पदाचा फॉर्मुला भाजपला देव केला आहे परंतु पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा महापौर यावर ते ठाम आहेत. त्यामुळे जालन्यात अजून युती संदर्भात निर्णय झालेला नाही.

FAQs

1. भास्कर आंबेकर कोणत्या गटातून शिंदे गटात गेले?
→ ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते आणि आता शिंदे गटात प्रवेश केला आहे.

2. अर्जुन खोतकरांनी कोणती भूमिका बजावली?
→ खोतकरांनी या पक्षप्रवेशामागे महत्त्वाची भूमिका घेत राजकीय डाव साधला आहे.

3. या घडामोडीचा उद्धव ठाकरेंच्या गटावर काय परिणाम होईल?
→ उद्धव गटातील स्थानिक बळ कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

4. भास्कर आंबेकरांनी शिवसेनेत प्रवेश का केला?
→ स्थानिक विकास आणि शिंदे गटाच्या नेतृत्वाशी असलेले संबंध यामुळे त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

5. जालना जिल्ह्यात पुढील राजकीय समीकरण काय असू शकते?
→ शिंदे गट अधिक बळकट होईल आणि आगामी स्थानिक निवडणुकांत त्यांना फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT