Arjun Khotkar Jarange Patil Eknath Shinde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar News : एकनाथ शिंदेंवरील टीका थांबवा, अन्यथा...; खोतकरांचा मराठा आंदोलक जरांगे पाटलांना इशारा

Maratha Reservation : जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका थांबवा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

सरकारनांमा ब्यूरो

विष्णू नाझरकर

Jalna News : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषा वापरत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टीका होत आहे. यावरून शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचे रुपांतर आता संतापात होऊ लागले आहे.

जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका थांबवा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. ज्या एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, त्यांच्यावरच टीका केली जाणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही खोतकर म्हणाले.

शहरातील एका हॉटेलमध्ये शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर खोतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र, मनोज जरांगे हे सध्या शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. त्यामुळे शिंदे यांची नाहक बदनामी होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ही टीका थांबवली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात सुमारे ६० लाख कुणबी नोंदी शोधून त्याआधारे ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

असे असतानाही मनोज जरांगे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनुचित भाषा वापरून टीका केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही आतापर्यंत संयम बाळगला आहे; मात्र आमचा संयम ही आमची दुर्बलता समजू नये. यापुढेही एकनाथ शिंदे यांच्यावर अशाच पद्धतीने टीका झाली, तर शिवसैनिक शांत बसणार नाहीत. मैदानात उतरून आंदोलन करू, असा इशाराही खोतकर यांनी दिला.

जरांगेंचा बोलवता धनी कोण?

मनोज जरांगे हे शिंदे यांच्यावर टीका करीत असले, तरी त्यांच्या मागे ‘बोलावते धनी’ दुसरेच आहेत असा दावा खोतकर यांनी केला. यामागे कोण आहे, याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करू, असेही खोतकर म्हणाले. एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांचे अत्यंत आवडते नेते होते. अचानक जरांगे यांची भाषा बदलली आहे. मग शिंदेसाहेब अचानक त्यांच्यासाठी नावडते का झाले? असा सवालही खोतकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT