Haribhau Bagde : फुलंब्रीच्या राजकारणावर हरिभाऊ बागडेंची पकड कायम; अनुराधा चव्हाण-सुहास शिरसाठ या दोन आमदारांना एकत्र आणले!

Haribhau Bagde’s political influence in Phulambri remains in focus: हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात आमदार अनुराधा चव्हाण आणि विधान परिषद सदस्य सुहास शिरसाठ यांची उपस्थिती चर्चेत आली. फुलंब्रीतील जुन्या राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली.
Haribhau Bagde’s political influence in Phulambri
Haribhau Bagde’s political influence in Phulambri Sarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly Constituency : फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर माजी आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची पकड कायम आहे. अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या बागडेंचा शब्द येथील नेता, पदाधिकारी व सामन्य भाजप कार्यकर्त्यासाठी प्रमाण असतो. राजकीय पक्ष म्हटलं की अंतर्गत मतभेद, हेवेदावे, स्पर्धा, महत्वाकांक्षा आल्याच. पण या सगळ्यांचा समतोल राखत बागडे यांनी पक्षाची ताकद अधिक वाढवली.

२०२४ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीपासून फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अनुराधा चव्हाण आणि नुकतेच छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले आमदार सुहास शिरसाठ यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता. विशेष म्हणजे हे दोनही नेते हरिभाऊ बागडे यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. परंतु मतदारसंघातील वर्चस्व वादातून दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम खटके उडायचे.

भाजपाची ताकद असलेल्या मतदारसंघासाठी असलेली ही धोक्याची घंटा अनुभवी बागडे नानांनी वेळीच ओळखली. विधानसभेसाठी संघटनात्मक निवड प्रक्रियेत अनुराधा चव्हाण यांना पसंती मिळाल्यानंतर बागडे यांनी त्याचे स्वागतच केले. त्यावेळी उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या सुहास शिरसाठ यांची नाराजीही ते ओळखून होते.

विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच, बागडे नानांनी सुहास शिरसाठ या कार्यकर्त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ टाकली. बागडे नानांच्या शब्दाचा मान राखत या नावाला पसंती दर्शवत मुख्यमंत्र्‍यांनी सुहास शिरसाठ यांच्या नावावर छत्रपती संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिक्कामोर्तब केले.

महायुतीचे संख्याबळ भक्कम असल्याने सुहास शिरसाठ विक्रमी मतांनी निवडूनही आले. आता कधी काळी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही आमदार सोबत वावरताना दिसत आहेत. फुलंब्रीच्या राजकारणातला हाच बागडे पॅटर्न असल्याची चर्चा या निमित्ताने रंगू लागली आहे.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. या संपूर्ण दौऱ्यात आमदार अनुराधा चव्हाण आणि विधान परिषद सदस्य सुहास शिरसाठ विविध कार्यक्रमांना सातत्याने उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे फुलंब्रीच्या राजकारणात बागडे यांचा प्रभाव आणि त्यांच्या नेतृत्वातून पुढे आलेल्या राजकीय चेहर्‍यांची जवळीक पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Haribhau Bagde’s political influence in Phulambri
Suresh Bankar news : अब्दुल सत्तारांची फुलंब्रीत लुडबुड वाढताच भाजपने कट्टर विरोधकाला दिली ताकद; सुरेश बनकर जालीम उपाय शोधणार?

हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष नेतृत्व करताना भाजपची संघटनात्मक बांधणी केली. गावागावांत पक्षाची संघटनात्मक ताकद निर्माण करताना अनेक कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वाला त्यांनी राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे फुलंब्रीच्या राजकारणात बागडे यांच्या नेतृत्वाचा स्वतंत्र ठसा निर्माण झाला आहे.

बागडे यांच्या राजकीय प्रवासात फुलंब्रीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते पुढे आले. त्यामध्ये अनुराधा चव्हाण आणि सुहास शिरसाठ यांची राजकीय वाटचालही महत्त्वाची मानली जाते. विधानसभा निवडणुकीत अनुराधा चव्हाण यांची आमदार म्हणून निवड झाली, तर सुहास शिरसाठ यांची विधान परिषदेत वर्णी लागली. त्यामुळे फुलंब्रीचे राजकीय प्रतिनिधित्व आता दोन वेगवेगळ्या सभागृहांत पहायला मिळते आहे.

राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हरिभाऊ बागडे यांचे फुलंब्रीशी असलेले राजकीय संबंध आणि जुना कार्यकर्ता वर्ग यामुळे त्यांच्या प्रत्येक छत्रपती संभाजीनगर दौऱ्याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात आमदार अनुराधा चव्हाण आणि सुहास शिरसाठ यांची विविध कार्यक्रमांमधील उपस्थिती त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे.

फुलंब्रीच्या राजकारणात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटनेच्या दृष्टीने विविध राजकीय घडामोडी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बागडे यांच्याशी असलेले संबंध, चव्हाण-शिरसाठ यांच्यातील समन्वय आणि मतदारसंघातील संघटनात्मक राजकारण याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Haribhau Bagde’s political influence in Phulambri
Suresh Bankar news : अब्दुल सत्तारांची फुलंब्रीत लुडबुड वाढताच भाजपने कट्टर विरोधकाला दिली ताकद; सुरेश बनकर जालीम उपाय शोधणार?

दरम्यान, राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे यांची घटनात्मक भूमिका राजकारणापेक्षा वेगळी असली, तरी फुलंब्रीतील त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासामुळे त्यांच्या दौऱ्याला स्थानिक राजकीय संदर्भ जोडला जातो. त्यामुळे त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात चव्हाण आणि शिरसाठ यांची सातत्यपूर्ण उपस्थिती ही औपचारिक राजकीय शिष्टाचाराचा भाग होती की जुन्या राजकीय नात्याचे दर्शन याबाबत चर्चा सुरू आहेत.

बागडे यांच्या नेतृत्वातून घडलेले दोन चेहरे सध्या विधानसभा आणि विधान परिषदेत सक्रिय आहेत. त्यामुळे फुलंब्रीच्या राजकारणात 'बागडे पॅटर्न'ची चर्चा पुन्हा रंगणे स्वाभाविक ठरले आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडींमध्ये या समीकरणाची भूमिका काय राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com