Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan on Ram Mandir : नावाला काळं फासलं तरी चव्हाणांनी राम मंदिराचा मुद्दा काढलाच…

Laxmikant Mule

Nanded News : अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन आठ दिवस झाले आहेत. या सोहळ्यापासून काँग्रेस दुरच राहिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्ष रामाच्या नावाने राजकारण करत आहे, असा जोरदार हल्ला महिला मेळाव्यात भाजपवर केला. विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अशोक शंकरराव चव्हाण यांच्या नावाने नांदेड व जिल्हाभरात विशेष फलक लावण्यात आले होते. यातून चव्हाण यांनी भाजपवर रामाच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप करत शालजोडीतून टोले लगावले होते.

बॅनर वरील अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नावाला अज्ञातांकडून काळे फासण्यात आले होते. त्यामुळे अशोक चव्हाण आता या विषयावर बोलणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, कालच्या काँग्रेस (Congress) महिला मेळाव्यात चव्हाण यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला. देशाच्या राजकारणात (Politics) व समाजकारणात गेल्या पाच दशकात राम मंदिराचा (Ram Mandir) मुद्दा चर्चेत राहिला आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात आंदोलन करण्यात आली. शेवटी राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटला व मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची मुर्ती विराजमान झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दीवाळी साजरी करण्यात आली. अयोध्येत झालेल्या मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीने शुभेच्छा फलक लावण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव पाटी येथे शुभेच्छा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. या फलकांवरील त्यांच्या नावावर काळे फासण्यात आले होते. नांदेड शहरात पार पडलेल्या महिला मेळाव्यात अशोक चव्हाण यांनी पुन्हा रामाचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही देवाचा व रामाचा राजकारणासाठी वापर करत नाही. राम आमच्या ह्रदयात आहे, आम्ही रामभक्त आहोत. रामाला मतपेटी पर्यंत नेले नाही, अशा शब्दात चव्हाण यांनी भाजपला खडे बोल सुनावले. महिलांनी भावनिक न‌ होता महागाई वाढवणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवाव, असे आवाहन केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच काँग्रेस सावध आणि आक्रमकही झाली आहे. पक्षाच्या धोरणाप्रमाणे या मुद्यावर ज्येष्ठ नेते व पदाधिकारी बोलताना दिसून येत आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा असायचा. मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावर प्रत्युत्तर तयारी काँग्रेसनेही केली आहे, हेच अशोक चव्हाण यांच्या कालच्या भाषणातून दिसून आले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT