Ashok Chavan Marathwada News Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश!

Nanded Latur Railway Project : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याचे संकेत असून खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून नागपूर-मिरज रेल्वे अंतर सुमारे 184 किलोमीटरने कमी होण्याची शक्यता आहे.

Jagdish Pansare

Lok Sabha Session 2026 : भाजपाचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांनी ससंदेच्या अधिवेशनात नांदेड-लातूर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाला तातडीने मान्यता देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या विकासात महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या रेल्वे मार्गाबाबत अशोक चव्हाण यांनीच महत्त्वाची माहिती दिली आहे.

संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असल्याचे सांगत नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याचे शुभसंकेत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्याशी यासंदर्भात माझी मागील काही महिन्यात अनेकदा चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर राज्यसभेतही मी हा विषय पुन्हा विस्तृतपणे मांडला, असे चव्हाण यांनी म्हटले.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला यश येत असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मी पालकमंत्री असताना 'महारेल'च्या माध्यमातून नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर विधानसभेत पाठपुरावा करून हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने 'फायनल लोकेशन सर्व्हे' पूर्ण केला आहे. नांदेड-लातूर हा केवळ मराठवाड्यातील दोन शहरांना जोडणारा मार्ग नसून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जवळ आणणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

पूर्वीपासूनच निर्माणाधीन असलेला वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि नांदेड-लातूर हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मिरज या दोन प्रमुख जंक्शनमधील अंतर तब्बल 184 किलोमीटरने कमी होईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगीतले.

सव्वा तासात पूर्ण होणार प्रवास

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा दावा करत खासदार अशोक चव्हाण यांनी या 104 किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्राने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी केली. मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या दोन कृषी व व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या शहरांना थेट रेल्वे मार्ग नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या रेल्वेने 212 किमीचा वळसा घालून जाण्यासाठी 6 तास लागतात, तर रस्ते मार्ग 144 किमीचा आहे. प्रस्तावित 104 किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य असल्याचे चव्हाण यांनी सभागृहात सांगीतले होते.

ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर 911 किमीवरून 807 किमीवर येईल. म्हणजेच सुमारे 184 किमीचे अंतर कमी होईल. याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूर सारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चात आपला 50 टक्के वाटा उचलण्याचे आधीच मान्य केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT