

Dharashiv Politics : धाराशिव झेडपीमध्ये महायुतीचे बहुमत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून झेडपीचा अध्यक्षपदावरून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आहे. बहुमत असूनही अध्यक्षपदावरून दोन्ही पक्षात तिढा कायम आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राहिले असले तरी काही ठिकाणी भाजप व शिंदे शिवसेना समोरासमोर आल्याने व धाराशिवमधील बैठकीत एकमत झाले नसल्याने पुन्हा हा विषय मुंबई दरबारी आला आहे.
परंड्याचे आमदार तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, प्रवक्ते योगेश केदार यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्रित मंगळवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यानुसार आता बुधवारी रात्रीपर्यंत सीएम फडणवीस-एकनाथ शिंदे यांची बैठक होणार असून यामध्ये धाराशिव झेडपीचा अध्यक्ष भाजपच्या अर्चना पाटील की शिंदे शिवसेनेच्या उषा गायकवाड होणार यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मंगळवारीच रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष होणार यावर एकमत झाले आहे. या चार झेडपीमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार, अशी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मात्र, धाराशिव झेडपीबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याबाबत बुधवारी रात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. धाराशिव झेडपी अध्यक्षाची निवडणूक 13 मार्चला होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसात निर्णय घ्यावा लागणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, झेडपी अध्यक्ष निवडीसाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, सत्तास्थापनेबाबतचा फॉर्म्युला ठरत नसल्याने भाजप, शिंदे यांच्या शिवसेनेतील तिढा कायम आहे. 54 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या धाराशिव झेडपीमध्ये पक्षीय बलाबल पहिले तर भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15, उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, काँग्रेसचे 3, अपक्ष व इतर पक्षाचे 4 सदस्य निवडून आले आहेत. महायुती एकत्र आल्यास बहुमतपेक्षा अधिकचे संख्याबळ आहे. मात्र, भाजप व तानाजी सावंत गटाचे फारसे सख्य नसल्याने सत्तास्थापनेबाबत तिढा निर्माण झाला आहे.
आठ दिवसापूर्वीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी बैठक झाली होती. त्यावेळी पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत स्थानिक पातळीवर बोलणी करून महायुती करण्याच्या सूचना शिंदे यांनी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकही झाली. मात्र, पंचायत समिती सभापती निवडीवेळीच महायुतीमध्ये एकमत झाले नाही.
आठ पंचायत समितीपैकी पाच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सभापती झाले तर तीन ठिकाणी भाजपचे सभापती झाले. त्यातच आता झेडपी अध्यक्षाची निवड शुक्रवारी होणार आहे. मात्र, सत्तास्थापनेबाबतचा फॉर्म्युला ठरत नसल्याने भाजप व शिंदे शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळेच मंगळवारी शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतेमंडळीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व नेते पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथे एकत्र आले होते.
या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी 15 शिवसेनेचे सदस्य एकत्र असल्याचे सह्यांचे पत्र दिले. त्यासोबतच सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. दुसरीकडे हे सर्व नेते एकत्र येऊन भाजपकडून करण्यात येत असलेल्या दाव्यातील हवाच काढली आहे.
शिवसेनेचे सदस्य एकत्र नाहीत काही जण आमच्यासोबत आहेत. तर तानाजी सावंत गट शिवसेनासोबत नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करताना सावंत गट सोबत घेणार नाही, सेनेचे नेतेमंडळी एकत्र नाहीत असे भाजपकडून सांगितले जात होते. मात्र, सर्व नेते एकत्र आल्याने या दाव्यातील हवाच काढली आहे. त्यामुळे आता सीएम, डीसीएम बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पंचायत समिती निवडणुकीत आठ पैकी पाच सभापती झाल्याने शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप व शिंदे शिवसेनेची बरोबरी झाली होती. जिल्ह्यात दोघांचेही चार-चार नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे आता झेडपी अध्यक्षाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे 15, उद्धव ठाकरे सेना 7, काँग्रेस 3, बंडखोर 1 असे एकूण 11 व अपक्ष 3 असे एकूण 29 एकत्र आले असल्याचा आकडा शिवसेनेकडून सांगितला जात आहे. तर दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष व इतर पक्षाचे 4 असे एकूण 36 चा आकडा जुळला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता शुक्रवारी कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार? याची उत्सुकता मात्र शिगेला पोहचली असताना बुधवारी होत असलेल्या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
या बैठकीनंतरच धाराशिव झेडपीचा अध्यक्ष भाजपचा होणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ते ठरल्यानंतर भाजपच्या अर्चना पाटील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उषा गायकवाड या अध्यक्ष होणार हे ठरणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.