

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना प्रवेश दिला गेला. हा पक्ष वाॅशिंग मशीन झाला आहे, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होते. पण भाजपमधील हे इनकमिंग आणि त्याबद्दलचा वाद थांबायला तयार नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपाला आता अध्यक्षपद खुणावते आहे. त्यासाठी निवडून आलेल्या इतर पक्षातील सदस्यांना पक्षात घेण्याची स्पर्धा स्थानिक नेत्यांमध्ये लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका अवैध गर्भपात प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आलेल्या डाॅ. दिलीपसिंह राजपूत व त्याच्या जिल्हा परिषद सदस्य पत्नीने भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. झेडपी अध्यक्ष पदाची समीकरणं जुळवण्यासाठी हे इनकमिंग झाल्याची चर्चा आहे. मात्र या प्रवेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपावर सडकून टीका केली आहे.
जालना-भोकरदन हादरवून सोडणाऱ्या 'अवैध गर्भपात' प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली, पण भाजपच्या नेत्यांनी मात्र त्याला रेड कार्पेट घातले! ज्या नराधमाने पैशांच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा 'कत्तलखाना' उघडला, ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात केले आणि 45 दिवस पोलिसांना गुंगारा दिला.
तोच आरोपी आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. हेच का तुमचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'? की ही तुमची नवीन 'पोलिटिकल ड्रायक्लिनिंग' योजना, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच 'पवित्र' होतो? असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो नेत्यांसोबत फोटो काढत होता. हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? ज्या हातांत बेड्या असायला हव्या होत्या, तिथे भाजपाचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का? सत्तेच्या हव्यासा पोटी गुन्हेगारीचे इतके उघड समर्थन महाराष्ट्र आणि लोकांसाठी भयंकर आहे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागद येथील डॉ. तुप्ती दिलीपसिंह राजपूत या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य संतोष राठोड यांनी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.