Nanded BJP News : अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार अजित गोपछडे यांनी केलेल्या एका भाषणाची आठवण आज आवर्जून होते. मला भाजप समजायला अजून वेळ लागेल असे म्हणणाऱ्य अशोक चव्हाण यांच्या वाक्याचा धागा पकडत गोपछडे यांनी अशोकराव तुम्ही एकदिवस पक्षात अजगरा एवढे व्हाल, असा टोला लगावला होता. गोपछडे यांची ती भिती आता खरी होते की काय? अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना आता पक्षात एक वर्ष पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा महायुती हरली. त्यासाठी अशोक चव्हाण यांनाही जबादार धरले गेले. पण अशा परिस्थितीत शांत राहणे पसंत करत कुणालाही न दुखावता चव्हाण यांनी सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण यांना निवडून आणले.
लोकसभा निवडणुकीत असलेले विरोधातील वातावरण विधानसभेत नव्हते हे स्पष्ट झाल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. (Nanded) संघटनात्मक निवड प्रक्रियेमध्ये त्यांचा वाढता सहभाग यातून ते दिसून येत आहे. भाजपा मंडळ अध्यक्षाच्या निवडीनंतर आता शहर-जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निरीक्षकांकडून प्रदेशाकडे संभाव्य नावे बंद लिफाफ्यात पाठवण्यात आली आहेत.
यामध्ये अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांची नावे पुढे केली असल्याची माहिती आहे. अगदी मूळ भाजपाच्या आमदारांच्या काही विरोधकांची नावेही यात असल्याचे समजते. एकूणच काय तर नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक सगळी सुत्रं अशोक चव्हाण यांना आपल्याकडे ठेवायची आहेत. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसात भाजपाचे शहर-जिल्हाध्यक्ष जाहीर होणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी शिफारस केलेल्या नावांची घोषणा होते, की जुन्या निष्ठावंतांना न्याय मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशोक चव्हाणांची पसंती या नावांना?
नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष किशोर देशमुख इच्छूक आहेत. असे असताना गोविंदराव नागोलीकर, माजी नगराध्यक्ष सुनील शेटे, भोकरचे रामचंद्र मुसळे यांची नावे अशोक चव्हाण यांच्यातर्फे पुढे करण्यात आल्याची माहिती आहे. तर नांदेड महानगराध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण यांचे लाडके माजी आमदार अमर राजूकर आणि चैतन्य बापू देशमुख यांच्यात रस्सीखेंच आहे.
तर नांदेड दक्षिण या जिल्ह्यातील मोठ्या भागातील जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार राजेश पवार यांच्या पत्नीचे नाव देण्यात आल्याची माहिती आहे. तर याच पदासाठी अशोक चव्हाण यांच्याकडून आमदार पवार यांचे विरोधक असलेल्या श्रावण भिलवंडे व उद्योजक मारोतराव कवळे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. एकूणच काँग्रेसमध्ये असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्याशिवाय पत्ता ही हलत नव्हता. भाजपातही अशोक चव्हाण यांना ती परिस्थिती निर्माण करायची आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.