
Nanded Politics News : कधीकाळी नांदेड जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व राखलेल्या खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचे आॅल टाईम शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पहायला मिळतो आहे. अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसमधून राजकारणाला सुरूवात केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर आज जिल्ह्यातील बडे नेते बनले आहेत. अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही नांदेडमध्ये आपलाच आवाज चालणार हे दाखवून द्यायचे आहे. चव्हाण-चिखलीकर हे दोन्ही नेते आपले पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याचे खापर अशोक चव्हाण यांच्यावर फोडत विधानसभेच्या उमेदवारीसाठी चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. लोहा-कंधार मतदारसंघात विजय मिळवत आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एकचा पक्ष करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील चार आमदारांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांनी काँग्रेससह मित्रपक्ष असलेल्या भाजपा आणि त्यांचे जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांना दणका दिला आहे. माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादीत घेत चिखलीकरांनी (Pratap Patil Chikhlikar) अशोक चव्हाण यांना 'एक ही मारा, लेकीन साॅलीड मारा' अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रताप पाटील चिखलीकर यांना फ्री हॅन्ड देत नांदेडमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर या जिल्ह्यातील दोन पारंपारिक राजकीय शत्रूंमध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष या निमित्ताने आमने-सामने असतील, असे संकेत मिळू लागले आहेत. चव्हाण आणि चिखलीकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी केल्याचे चित्र आहे. एकीकडे खासदार चव्हाण हे काँग्रेस, शिवसेनेचे (ठाकरे) नेते कार्यकर्त्यासह इतर पक्षांच्या कार्यकत्यांना भाजपत खेचत आहेत.
तर दुसरीकडे चिखलीकरांनी राष्ट्रवादीला जिल्ह्यात 'नंबर वन' करण्याचा संकल्प सोडून माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदारांच्या हातात घड्याळ बांधण्याचा सपाटा लावला आहे. चव्हाण आणि चिखलीकर या प्रतिस्पर्ध्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून आपापली ताकद दाखवण्याची संधी असून, प्रतिष्ठेसाठी उभय नेते साम, दम, दंड, भेदचा वापर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, चव्हाण - चिखलीकर या नेत्यांत थेट स्पर्धा झाल्यास स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडीला घरघर लागली. मतदारसंघातील काँग्रेस व शिवसेनेचे प्रमुख आणि कार्यकर्ते एक तर भाजप किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करून मोकळे झाले आहेत. काही चव्हाणांच्या, तर काही चिखलीकरांच्या गळाला लागले. आगामी निवडणुकीत चव्हाण - चिखलीकर यांच्यात समेट होतो की, हे दोघे स्वतंत्र उमेदवारांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे लवकरच स्पष्ट होईल.
कंधार लोह्यासह नांदेड जिल्ह्याचे राजकारण चव्हाण आणि चिखलीकर यांच्या भवतीच फिरते. गेल्या लोकसभा निवडणुकीचा काही काळ सोडला तर गेली 20 वर्षे चव्हाण आणि चिखलीकरांचे राजकीय वैर जिल्ह्यातील जनता जाणून आहे. अलीकडे हे वैर उफाळून आल्याचे चित्र आहे. एकमेकांना शह देण्यासाठी उभय नेते कुठलीही संधी सोडत नसल्याचे दिसून आले आहे. विविध कार्यक्रम, जाहीर सभातून दोन्ही नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करीत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चव्हाण - चिखलीकर भिडणार, असेच दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.