Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan in Bjp : काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप? अशोक चव्हाणांनंतर 'हे' दोन आमदार भाजपच्या वाटेवर

Laxmikant Mule

Ashok Chavan Nanded Politics News :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नांदेड जिल्ह्यातील मोहन अण्णा हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे दोन आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत हे दोन्ही आमदारही भाजपमध्ये दाखल होणार असल्याची खात्रिलायक माहिती आहे. त्यामुळे Ashok Chavan यांच्या नांदेड जिल्ह्यापासूनच काँग्रेस आमदारांच्या फुटीला सुरुवात होणार आहे.

मराठवाड्यातील आठपैकी अशोक चव्हाण यांच्यासह तीन आमदार भाजपवासी होणार आहेत. उर्वरित पाच आमदारांच्या भूमिकेकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. देगलुर- बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर हे 2009 व 2019 मध्ये निवडून आले होते, परंतु कोरोना काळात त्यांचे अकाली निधन झाले आणि या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली होती. त्यांना निवडून आणण्याची सगळी जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. सभा, मेळावे दौरे करत चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांना 42 हजार एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते. त्यांनी भाजपच्या सुभाष साबणे यांचा पराभव केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचेही त्यांच्या विजयात मोठे योगदान आहे. त्यामुळे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यासाठी अशोक चव्हाण सांगतील ती पूर्व दिशा असते, असेही बोलले जाते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भाजपमध्ये जाण्याची तयारी त्यांनीही केली आहे. त्यांच्याप्रमाणेच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन अण्णा हंबर्डे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. फारशी तयारी नसतानाही ते तिरंगी लढतीत साडेतीन हजार मतांनी निवडून आले होते. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. ज्या अशोक चव्हाण यांच्यामुळे हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर हे पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढले, ते आता त्यांच्यासोबतच पुढची राजकीय इनिंग खेळणार आहेत. दोन दिवसांत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात या दोघांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

edited by sachin fulpagare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT