Amit Shah - Ashok Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Amit Shah News: अशोक चव्हाणांचे भाजपमध्ये ट्युनिंग जुळले; व्यासपीठावर अमित शाहांच्या शेजारी

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझे हे पहिलेच भाषण आहे, असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या छोटेखानी भाषणातही भाव खाल्ला. विशेष म्हणजे भाजपमध्ये दाखल होऊन पंधरा दिवसही झाले नाही, तरी अशोक चव्हाण यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले ट्युनिंग असल्याचे दिसून आले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाषण करत असतांना चव्हाण हे आपल्या खुर्चीवरून उठून अमित शाह यांच्या बाजूला येऊन बसले होते. यावेळी दोघांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा सुरू होती. भाजपच्या इतर कुठल्याही नेत्यापेक्षा व्यासपीठावर शाह नव्यानेच पक्षात आलेल्या चव्हाण यांच्याशी अधिकवेळ बोलत होते. चव्हाण आणि शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल? याची उत्सुकता व्यासपाठीवर बसलेल्या त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांना लागली नसेल तर नवलच.

भाजपमध्ये आल्यानंतर माझे पहिले भाषण असून मला आपल्या परिवारात सहभागी करून घेतले त्याबद्दल आपले आभार असे म्हणत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाषणाला सुरूवात केली. पक्षात आल्यानंतर चोवीस तासात राज्यसभेवर संधी दिली, त्याबद्दलही आपले धन्यवाद. चारशे पारचा नारा आम्ही पूर्ण करून दाखवू. तुम्ही टाकलेली जबाबदारी सगळे मिळून पार पाडू, असा शब्दही चव्हाण यांनी सर्वाच्या वतीने अमित शाह (Amit Shah) यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानत त्यांच्या काळात पाच वर्षात खूप विकासकामे झाल्याचा उल्लेखही चव्हाण यांनी केला. आता मराठवाड्याच्या विकासाची भूक आम्ही भागवण्याचे काम करू. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, गरीबांसाठी मोठ्या योजना सरकारने दिल्या. केंद्राचे मोठे योगदान मुंबईसह राज्य, मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलण्यात असल्याचे चव्हाण म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एम्स, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या, एमबीबीएसच्या जागा वाढल्या. गरीबांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामे झाली याचा आवर्जून उल्लेख करत मी काँग्रेसमध्ये असताना कधीही मोदींवर टीका केली नाही. चांगल्या कामाची प्रशंसा केलीच पाहिजे, असे म्हणत चव्हाण यांनी आपली बाजू सावरून नेली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT