ajit pawar ncp worker sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारी योजनांचं गुणगाण, मात्र सोयाबीनचा भाव विचारताच उडाली भंबेरी

Datta Deshmukh

Maharashtra Politics: सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. योजनांची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या 'जनसन्मान यात्रे'ला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना 2014 मध्ये सोयाबीनला 4500 रुपये भाव आणि आता 10 वर्षांनी उत्पादनाचा खर्च पाच पट वाढलेला असताना 3800 रुपये भाव कसा, या प्रश्‍नावर पदाधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. ‘तुम्ही उत्तर द्या’ म्हणत एकमेकांकडे बोट दाखवण्याची वेळ आली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) , खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते मंडळी गुरुवारी (ता. 29) बीडमध्ये जनसन्मान यात्रा घेऊन बीडमध्ये येत आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे, डॉ. सारिका क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.

शासनाच्या विविध योजनांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. योजनांचा उहापोह करण्यासाठी पक्षाने काढलेल्या 'जनसन्मान यात्रे'ला देखील प्रतिसाद मिळत असून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लोकप्रिय ठरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर बहिणीच्या दाजीच्या सोयाबीनच्या भावाचे काय, याव प्रश्नावर पदाधिकारी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. 6200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, ही पक्षाची भूमिका असून लोकांच्या भावना पक्षाच्या कानावर घालणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेली.

त्यात जिल्ह्यात पक्षाची महिला आघाडी सक्षमपणे काम करत असताना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या समितीमध्ये एकही महिला नाही, या प्रश्नावर पत्रकारांना सर्व 'निगेटिव्ह'च असं म्हटलं. मात्र, या उत्तरावर पत्रकारांनी हरकत नोंदविली. त्यामुळेही काही काळ गोंधळच झाला.

दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, महाभारत, रामायणांमधील काही दाखले देत आम्हाला बहीण तारुन नेईल, असा विश्‍वास व्यक्त केला. बलात्कारांच्या घटना विकृत मनोवृत्तीचा भाग असल्याचेही ते म्हणाले.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT