Beed, 17 June : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा कोणताही विषय माझ्या कानावर नाही. काही तरी चुकीचं सांगितलं जात आहे. कार्यक्रमाला लोक जमविण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना थोपवून ठेवण्यासाठी अशा विषयाची चर्चा घडवून आणली जात असावी, असा टोला आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला.
जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar ) यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा रविवारी बीडमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यापर्यंत ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्याबाबत आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar ) यांनी प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी अशी चर्चा घडविली जात असल्याचा आरोप केला.
संदीप क्षीरसागर म्हणाले, जयदत्त क्षीरसागर हे वारंवार तीच तीच भाषणं करत आहेत. मात्र, आपली भूमिका जाहीर करत नाहीत. राजकारणात आपली भूमिका स्पष्ट लागते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. जयदत्तअण्णा सध्या कोणत्याही राजकीय फ्रेममध्ये राहिले नाहीत.
क्षीरसागर कुटुंबीय सध्या तरी एकत्र येत नाही. मुळात हा कुटुंबाचा विषय नाही. राजकारण आणि समाजकरणात एक भूमिका घेऊन चाललं पाहिजे. आमच्या काकू-नानांपासून जी भूमिका होती, त्या भूमिकेवर मी ठाम राहिलो. पक्षाचे कधी सरकार आले, कधी आले नाही. अनेक अडचणी आल्या. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो.
आमची राजकारणात तिसरी पिढी आहे. आमच्या काकूंची जी भूमिका होती, त्या भूमिकेसोबत मी आयुष्यभर ठामपणे राहणार आहे, असेही आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
संदीप क्षीरसागर म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला माझे वडिल रवींद्र क्षीरसागर आणि भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली, हे खरे आहे. पण महाराष्ट्रात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. राजकारण विकोपाला गेलेले आहे.
आपण राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावर जात असताना निवडून येण्यापूर्वीच्या भूमिकेसोबत राहिले पाहिजे. ज्या गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून बोलतो, त्या विषयांवर आपण बोललं पाहिजे. आपल्याला लोकांना निवडून दिल्यावर आपण लोकांचे होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.