Manoj Jarange Patil, Marathwada News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : युती-आघाडीत संधी न मिळणाऱ्या इच्छुकांची मनोज जरांगे यांच्याकडे धाव..

Jagdish Pansare

अविनाश काळे

Marathwada Political News : राज्यातील महायुती-महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या, पण प्रस्थापितांमुळे संधी मिळण्याची शक्यता नसलेले अनेकजण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे धाव घेताना दिसत आहेत. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे.

विशेषत: महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. उमरगा, लोहारा तालुक्याच्या राजकारणात शिवसेना व कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलेली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बसवराज पाटील भाजपामध्ये गेल्याने त्यांना मानणारा विशेषत: मागासवर्गीय व मुस्लीम समाज बांधवांच्या एकगठ्ठा मताची विभागणी होईल असे चित्र आहे.

पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षाला `अच्छे दिन` येण्याची स्थिती येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना लोकसभा निवडणूकीसाठी ऐनवेळी डावलल्याने, त्यांच्या बाबत लोकांमध्ये सहानभूती आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी अर्थ व बांधकाम  सभापती अँड. अभयराजे चालुक्य यांनी पक्षाची मोट बांधली आहे.

महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात सध्या तरी एकसंघपणा दिसून येत असला तरी तीन टर्म आमदारकीची संधी मिळालेले शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. (Manoj Jarange Patil) माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांचे बळ त्यांच्याच पाठीशी आहे. असे असले तरी महायुतीतील अन्य पक्षामधुन उमेदवारीसाठी छुपे प्रयत्न सुरु आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांनी शनिवारी (ता.24) अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यांच्या सोबत दिग्विजयचे वडिल, महायुतीतील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. भाजपाचे शिंदे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार होते. त्यांना 33 हजार मते मिळाली होती.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने विचारणा केल्यानंतर आपण नकार दिल्याचे शिंदे सांगतात. मुलगा दिग्विजयसाठी मात्र त्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. त्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येणाऱ्या काळात दिसुन येईल.  दरम्यान नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूकीच्या तयारीत असलेले सातलिंग स्वामी यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीतही गर्दी..

आमदार चौगुले यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडल्याने, येथुन शिवसेना उबाठाचा उमेदवार निवडणूकीत राहिल. मात्र त्यांना अद्याप प्रबळ उमेदवार मिळालेला नाही. प्रा. डॉ. संजय कांबळे, विलास व्हटकर, विरपक्ष स्वामी, रमेश धनशेट्टी, अशोक सरवदे, सदाशिव भातागळीकर, सातलिंग स्वामी, अजयकुमार देडे, प्रशांत काळे, प्रा. डॉ. नारायणकर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर कॉंग्रेसमध्ये सक्रिय झालेले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या माध्यमातुन विजय वाघमारे यांचा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दिलीप भालेराव यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. वास्ताविक भालेराव हे भाजपात गेलेले बसवराज पाटील यांचे खंदे समर्थक आहेत, त्यांनी उमेदवारीसाठी सुरु केलेल्या प्रयत्नामागे नेमके कोणते कारण, राजकारण आहे? याची चर्चा होत असून यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT