Ambadas Danve In Assembly Budget Session 2025 News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : विधिमंडळात अंबादास दानवे यांचाच आवाज! सत्ताधाऱ्यांना ठरले भारी..

: In the legislative assembly session, Ambadas Danve raised his voice against the ruling party, effectively turning their plans around. : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आसो, की कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे निर्माण झालेला वाद सगळ्यावर दानवे यांनी रोखठोक भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला.

Jagdish Pansare

Budget Session News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याची कमतरता दानवे यांनी परिषदेच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेरही जाणवू दिली नाही. सरकारवर तुटून पडत त्यांनी प्रत्येक मुद्यांची चिरफाड केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे नाव अध्यक्षांकडे देण्यात आले होते. परंतु त्यावर अखेरपर्यंत शिक्कामोर्तब झालेच नाही.

विधानसभेत विरोधी पक्षनेता नसला तरी विधान परिषदेत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आसो, की कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे निर्माण झालेला वाद सगळ्यावर दानवे यांनी रोखठोक भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला. बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पोस्टमार्टम करताना मराठवाडा, विदर्भावर कसा अन्याय झाला? हे मांडत दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरले.

औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी, त्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली. या मुद्यावरून राज्याचे गृहमंत्रीही असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात दंगल पेटली. (Shiv Sena) शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा अंबादास दानवे यांनी मुद्देसूद भाषणातून समाचार घेतला. औरंगजेबाचा द्वेष नक्कीच करा, पण इतर धर्मीयांचा आदरही करा, असा सल्ला देत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

दिशा सालियन प्रकरणाने पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून झाला, तेव्हा हा प्रयत्न हाणून पाडताना अंबादास दानवे सभागृहात चांगेलच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना सभागृहातच दरडावत दानवे यांनी त्यांची खोड मोडल्याचे दिसून आले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढती बेरोजगारी, जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरावस्था, आरोग्याचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला हमी भाव, कर्जमाफी, नुकसानभरपाईचे अनुदान, अशा मुद्द्यांना हात घालत अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून किल्ला नेटाने लढवला.

उद्धव ठाकरे प्रभावित..

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात बरेच दिवस उपस्थिति होती. विधान परिषदेत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष फार प्रभावी ठरू शकले नाही. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अधिक आक्रमक झाले होते. अनिल परब, भास्कर जाधव आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या तीन नेत्यांनी हाणून पाडला.

विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची ही कामगिरी समक्ष पाहिली. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड झाली नसली तरी विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडत कामगिरी चोख बजावली. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे यांचे हे कदाचित शेवटचे अधिवेशन ठरेल. संख्याबळ लक्षात घेता परिषदेत काँग्रेसचे आमदार अधिक आहेत. त्यामुळे या पदावर त्यांचा दावा असणार आहे. तर विधानसभेत शिवसेनेला संधी देण्याचे ठरले आहे. एकूणच काय, तर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंबादास दानवे यांचाच आवाज चालला, असे म्हणावे लागेल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT