Maharashtra Political News : राज्यात शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, उद्योगधंद्यांचे राज्याबाहेर होणारे स्थलांतर, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, शिक्षण क्षेत्राची लागलेली वाट असे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. या सगळ्या मूळ प्रश्नांपासून लोकांची दिशाभूल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आपला अजेंडा राबवत आहात, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
राज्यातील हे सगळे महत्त्वाचे प्रश्न औरंगजेबाच्या कबरीखाली दडले आहेत, म्हणून सत्ताधारी औरंगजेबाची कबर चर्चेत आणत असल्याचा घणाघातही दानवे (Ambadas Danve) यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेब याच्या कबरीवरून राज्यात गरमागरमी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेब याची कबर उखडून फेका, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात ठीकठिकाणी आंदोलने सुरू असून नागपुरात याच मुद्द्यावरून दंगल उसळली.
या दंगली मागे सत्ताधारी पक्षाचाच हात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना अंबादास दानवे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. (Devendra Fadnavis) औरंगजेबाच्या कबरीमागे काय दडले आहे? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी राज्यासमोर असलेल्या प्रश्नांच्या तक्रारीचा पाढाच मांडला. या लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठीच औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडूनच सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
यासंदर्भात दानवे यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना औरंगजेबाची कबर राज्यकर्त्यांना काढायची असेल तर त्यांनी ती जरूर काढावी. तुमच्या अगोदर मी आपल्या सोबत कुदळ, फावडे घेऊन असेल पण त्याआधी खालाील प्रश्नांची उत्तरे द्या. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यातील ढासाळलेली आरोग्य व्यवस्था, उद्योगधंद्यांचे राज्याबाहेर होणारे स्थलांतर, महिला सुरक्षेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेची लागलेली वाट, शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न यावर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय? हे स्पष्ट करावे.
एवढे प्रश्न राज्यासमोर असताना देवेंद्र फडणवीस मूळ प्रश्नापासून आपण लोकांची दिशाभूल करून आपला अजेंडा राबवत आहात, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला. याशिवाय राज्यातील स्थलांतरित होणारी शासकीय कार्यालयं, सुमार दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्त सरकारी पदांची न होणारी भरती, बंद होत असलेल्या सरकारी शाळा, कुजबुज गॅंग कडून छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी बदनामी.
तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशतः अनुदानित या व्यवस्थेने केलेला शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ, बेरोजगारी, पाणी समस्या, जयदीप आपटे, संतोष देशमुख, कोरटकर, सोलापूरकर कराड, मुंडे यांच्यामुळे सरकारची झालेली नाचक्की, असे एक ना अनेक प्रश्न औरंगजेबाच्या कबरीखाली दडले आहेत. म्हणून सत्ताधारी औरंगजेबाची कबर चर्चेत आणत आहे का? असा सवालही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.