Chhatrapati Sambhajinagar News, 09 Jun : विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी 'औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. ही बँक जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीने भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा मिटवण्याचा प्रयत्न झाला. या घडामोडी सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचाच उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी दबावतंत्राचे राजकारण करत विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला खोडा घालण्याचा प्रयत्न शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. राज्यात महायुती असताना भाजपच्या अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात सत्तार यांनी मुलगा समीर याला बंडखोरी करायला लावून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
माघारीसाठी वापरलेल्या या दबावतंत्राचा जिल्हा बँकेतील सत्ता राखण्यात उपयोग होईल या भ्रमात असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या भ्रमाचा भोपळा अखेर आज फुटला आहे. अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे.
मुलाचा अर्ज बाद झाल्यामुळे अब्दुल सत्तार हे प्रचंड संतापले असून ते आता आपला पुढचा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर समीर सत्तार यांनी आता पक्षाने आपलाही विचार केला पाहिजे असे म्हणत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत अर्ज दाखल केला होता.
सुरुवातीपासूनच हा उमेदवारी अर्ज वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. केवळ समीर सत्तारच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे, कन्नडच्या संजना जाधव या सर्वांच्या अर्जावर भाजप व इतर पक्षाच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवले होते.
या आक्षेपांवर कालपासून सुनावणी सुरू होती. समीर सत्तार संजय शिरसाट हर्षदा शिरसाट रमेश बोरणारे संजना जाधव यांच्या अर्जाचे काय होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुलाला माघार घ्यायला लावल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह सात संचालक शिवसेनेचे निवडून आले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली होती.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट आणि चर्चाही झाली होती. जिल्हा बँकेत अब्दुल सत्तार यांच्या मनाप्रमाणेच महायुती व अध्यक्ष पदाचा निर्णय घेतला जाईल असा शब्द सत्तार यांना देण्यात आला होता. यातूनच सत्तार यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशीही जुळवून घेतले.
मात्र भाजप आमचा बिस्मिल्ला करणार हा सत्तार यांचा धोका अखेर खरा ठरला आहे. समीर सत्तार यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य करत तो फेटाळल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संतापलेले अब्दुल सत्तार आता पुढे कोणती राजकीय खेळी करतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर असलेल्या काकासाहेब फरकाडे यांनी समीर अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल केला होता. समीर सत्तार यांनी ज्या सहकारी संस्थेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता ती थकबाकीदार निघाली. याशिवाय सोयगाव येथील समीर सत्तार यांच्या नावावर असलेल्या इमारतीतील गाड्यात जिल्हा बँकेची शाखा हलवल्यामुळे त्यांनी वैयक्तिक लाभ घेतल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो मान्य करत समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाल्याचे जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.