Co-oprative Bank Politics : ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, कल्याण काळे आणि जिल्ह्यातील दोन आमदार अशा सगळ्या राजकारण्यांचा भरणा असलेल्या औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा संचालक बसणार? की भाजपाचा याचा फैसला येत्या 20 जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलाच्या अध्यक्ष पदासाठी लावलेली फिल्डिंग यशस्वी होते की, भाजपा त्यांचा राजकीय गेम करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पडली आहे. खासदार संदीपान भुमरे हे आमदार विलास भुमरे यांना अध्यक्ष करण्यासाठी इच्छुक आहेत. तर सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत (अवघ्या 2420 मतांनी विजय) कानाजवळून गोळी गेलेले आमदार अब्दुल सत्तार हे आपल्या मुलाला अध्यक्ष करून मतदारसंघ ताब्यात ठेवू पाहत आहेत.
छत्रपती संभाजीगनर जिल्हा परिषदेत सत्तार-भुमरे यांच्या वादातूनच शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले होते. भाजपाने झेडपीत जसा शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केला, त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या राजकारणात होते की काय? अशी चिंता शिवसेनेच्या निवडून आलेल्या नऊ संचालकांना सतावू लागली आहे. भाजपाने मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेचे नेतृत्व खासदार संदीपान भुमरे यांच्या हाती होते.
पडद्यामागून मात्र अब्दुल सत्तार यांनीच निवडणूकीची सगळी यंत्रणा हाताळली आणि शिवसेनेचे 9 संचालक निवडून आणल्याचे बोलले जाते. पैकी पाच बिनविरोध तर चार हे प्रत्यक्ष मतदान होऊन विजयी झाले आहेत.
भाजपाचे सात संचालक तर दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या आहेत. 20 पैकी केवळ एक जागा काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या रुपाने महाविकास आघाडीच्या पॅनलला मिळाली होती. तर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलमधून निवडून आले आहेत.
शिवसेनेचे सर्वाधिक नऊ संचालक निवडून आल्याने अध्यक्ष पदावर या पक्षाचा दावा प्रबळ मानला जात आहे. अध्यक्ष पद कोणाला? याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे निवडणूक निकालानंतर मंत्री अतुल सावे यांनी जाहीर केले होते. आता 20 जुलै रोजी अध्यक्ष पदासाठीची बैठक होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हा बँक पूर्णपणे महायुतीच्या ताब्यात आली आहे. 20 पैकी 19 संचालक असल्याने अध्यक्ष पदासाठी मोठी स्पर्धा असली तरी छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र समीर सत्तार यांनी घेतलेल्या माघारीचे बक्षीस म्हणून बँकेच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली जाते का? की मग त्यासाठी अब्दुल सत्तार यांना महायुतीमध्येच फोडाफोडी करण्याची वेळ येणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अब्दुल सत्तार यांचे गेल्या दोन अडीच वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात अध:पतन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रीमंडळात स्थान न मिळणे, मतदारसंघात झालेला निसटता विजय, स्वपक्षीय नेत्यांशीच पटत नसल्याने सातत्याने उडणारे खटके या पार्श्वभूमीवर 'सत्तार नको' अशी रणनीती अध्यक्ष पदासाठी राबवली जात असल्याचे चित्र आहे. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे त्रिकूट सत्तारांचा गेम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य पातळीवरील नेत्यांची अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.