Shivsena-BJP Politics: औरंगाबाद जिल्हा बँकेतील वर्चस्व कायम राखण्यासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी आपली शक्तीपणाला लावली. पाच संचालक बिनविरोध तर प्रत्यक्ष निवडणुकीतून चार संचालक निवडून आणत शिवसेनेला मोठ्या भावाच्या भूमिकेत आणले. परंतु आता अध्यक्षपदावरून सत्तार विरुद्ध भुमरे असा संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे भाजपाने सत्तार यांनी विधान परिषदेत केलेली कोंडी याचा बदला घेण्याची ही संधी हेरली आहे. सत्तार यांच्या मुलाला अध्यक्ष पदासाठी पसंती देण्याऐवजी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार तथा बँकेचे संचालक विलास भुमरे यांच्या नावाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलेल्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पुन्हा दिसण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर महापालिका, जिल्हा परिषदेप्रमाणे जिल्हा बँकही शिवसेनेच्या ताब्यातून जाण्याचा धोका कायम आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे भाजपाचा फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाजी मारल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा रिकॅप जिल्हा बँकेत होऊ द्यायचा नसेल तर भुमरे-सत्तार यांना जुळवून घ्यावे लागेल, एवढे मात्र निश्चित.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालानंतर आता अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप ऐवजी शिवसेनेतच जुंपल्याचे चित्र आहे. अध्यक्षपदावरून खासदार संदीपान भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाने नवीन वळण घेतले आहे. तर दुसरीकडे भाजपने अध्यक्षपदासाठी पहिली टर्म मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह वाढल्यास अडीच वर्षांची पहिली टर्म भाजपला जाईल, असाही अंदाज आहे.
महायुतीतील स्थानिक नेतेमंडळी अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नुकत्याच झालेल्या जालना-छत्रपती संभाजीनगर विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी पुत्र अब्दुल समीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीतील भाजपसमोर पेच निर्माण केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्तरावर झालेल्या चर्चेनंतर समीर सत्तार यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संधी देण्याच्या आश्वासनानंतरच उमेदवारी मागे घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
याच पार्श्वभूमीवर सत्तार यांनी आता मुलाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बसवण्यासाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. जिल्हा बँकेत शिवसेनेचे सर्वाधिक 9, तर भाजपचे 7 संचालक आहेत. त्यामुळे मोठा भाऊ ठरलेली शिवसेना अध्यक्षपदाची दावेदार मानली जात असली तरी महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला ठरण्याची चिन्हे असून त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक संचालक निवडून आणत अब्दुल सत्तार यांनी मुलाला अध्यक्ष करण्याच्या दृष्टीने मोठा पल्ला गाठला. परंतु भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेचा पॅटर्न राबवत अध्यक्ष पदावरून भुमरे-सत्तार यांच्यात स्पर्धा लावून दिली आहे. भाजपाला सत्तार यांचे वावडे आहे, त्यामुळे त्यांनी भुमरे यांना भरीस पाडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळता सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार यांचे पुन्हा जिल्हा बँकेवर वर्चस्व भाजपला नको आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील 'सत्तार'राज संपुष्टात आणण्यासाठी भाजप आता भुमरे गटाला पुढे करत आहे.
अब्दुल समीर सत्तार यांच्याऐवजी खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यास भाजपची तयारी आहे. त्यामुळे आता सत्तार नेमकी काय खेळी खेळतील आणि त्यात भाजपची भूमिका काय असेल? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नियमानुसार, नवीन संचालक मंडळाच्या निवडीनंतर 15 दिवसांत अध्यक्षपदाची निवडणूक घेणे अपेक्षित आहे. त्यानूसार नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.