Marathwada Political News : औरंगजेबाची कबर उखडून फेका, अशी मागणी केली जात आहे. पण हे थडगं काढण्यापेक्षा ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी 'जगावं कसं अन् मरावं कसं' हे जगाला दाखवून दिलं, तो आमचा राजा किती महान होता हा इतिहास आजच्या पिढीला माहित झाला पाहिजे. त्यासाठी औरंगजेबची कबर आहे त्याच खुलताबादेत संभाजी महाराजांचे असे भव्य स्वागत उभारले गेले पाहिजे, की त्यापुढे औरंगजेबाची कबर लोक विसरतील, अशी अपेक्षा भाजपाचे नवनिर्वाचित आमदार संजय केनेकर यांनी व्यक्त केली.
'सकाळ थेट भेट' मध्ये संवाद साधताना संजय केनेकर यांनी औरंगजेब (Aurangzeb) कबरीच्या मुद्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले. जातीयवाद आणि धार्मिक कट्टरता कमालीची वाढली आहे, यातून राज्यात अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे केनेकर म्हणाले. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज त्याच्यापेक्षा किती महान, धर्माभिमानी होते, हे दाखवण्याचा प्रयत्न जिथे औरंगजेबची कबर आहे, त्याच खुलताबादेत भव्य स्मारक उभारून केले जावे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आपण तशी मागणी केली असल्याचे केनेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी देत (BJP) भाजपामध्ये काम करणाऱ्या छोट्यात छोट्या कार्यकर्त्याचीही दखल घेतली जाते, त्याचा सन्मान केला जातो हे दाखवून दिले. ही सुरुवात असून भविष्यात पक्षासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता राबणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळेल, असा विश्वास वाटू लागला आहे. शहरात मंदिरासमोर नारळ विकणारा मी गेली अनेक वर्ष भाजपामध्ये काम करतो आहे. आमदार झालो म्हणून त्यात कुठेही खंड येणार नाही, अशी ग्वाही केनेकर यांनी यावेळी दिली.
मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने मी एका जिल्ह्याचा नाही तर मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठवाड्यात पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ज्या ज्या योजना राबवणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. मला किती काळासाठी संधी मिळाली, पुढे मिळेल की नाही? याचा विचार न करता मिळालेला कार्यकाळ मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घालवणार असल्याचे केनेकर म्हणाले.
पक्षात येणाऱ्या प्रत्येकासाठी दार उघडे..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले राजू शिंदे हे पुन्हा भाजपात घरवापसी करु पाहत आहेत. पण त्यांना स्थानिक नेत्यांचा प्रखर विरोध आहे, अशावेळी त्यांना प्रवेश मिळेल का? यावर जे आमचे कधीच नव्हते, त्यांना पक्षात सामावून घेतले, मग हे तर आमच्याच पक्षातून बाहेर गेले होते. एखादा पदाधिकारी पक्ष सोडून गेला आणि भविष्यात त्याला पुन्हा यावे वाटले तर त्याला घेऊ नये, असा काही नियम नाही, असे स्पष्ट करत केनेकर यांनी राजू शिंदे यांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिले.
महापालिका महायुती एकत्र लढणार..
आगामी महापालिका निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार आहे. राज्यात जे समीकरण जुळून आले आहे, तेच महापालिका निवडणुकीतही दिसेल. स्थानिक पातळीवर स्वबळावर लढावे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. पण एकदा महायुतीमध्ये लढून सत्ता मिळते हे लक्षात आल्यावर मित्र पक्षांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. पण महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही केनेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.