Babajani Durrani Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durrani: रामनामाची अल्पसंख्याकांना चिंता, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दुर्राणींचा मोदीविरोधी सूर...

Parbhani NCP Ajit Pawar Group News : गेल्या दहा वर्षांत देशाचा विकास होत आहे आणि या मुद्द्यावरच आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो.

Prasad Shivaji Joshi

Parbhani NCP News : गेल्या दहा वर्षांत देशाचा विकास होत आहे आणि या मुद्द्यावरच आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाहीरपणे सांगत आहेत, तर दुसरीकडे खुद्द अजितदादांच्या उपस्थितीतच मुंबईत झालेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात पक्षाच्या धोरणाविरुद्ध वक्तव्यं केली गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मेळाव्यात पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गेल्या दहा वर्षांत देशातील वातावरण बिघडले असून, त्याबाबत आम्हाला चिंता वाटत असल्याचे सांगितले. तसेच रामनामावरून राजकारण होत असल्याचा आरोपही केला. अजित पवारांच्या उपस्थितीत अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Parbhani NCP Ajit Pawar Group

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचारधारा मानणारा पक्ष आहे. पक्षात नेहमीच अल्पसंख्याक समाजाविषयी सहानुभूती व्यक्त केली जाते. मात्र, अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे पुरोगामी विचार मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची अडचण होत आहे. नव्या विचारांशी जुळवून घेणे कठीण असल्याचेच नेत्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

दोन पक्षांची आघाडी झाली, सत्तेत सहभागी झाले. मात्र, अनेक वर्षांपासून ज्या विचारधारेचे संस्कार झाले, जे विचार भाषणातून व्यक्त झाले. ज्याचा मनावर ठसा उमटला त्यामधून इतक्या सहजासहजी बाहेर पडणे शक्य नसल्याचे दुर्राणी यांच्या वक्तव्यामधून दिसून आले. अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सहभागी झालेल्या अनेक नेत्यांची सध्या अडचण झाली आहे. अशावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अल्पसंख्याक मेळाव्यात आपले मन मोकळं केलं. आता याचा राजकीय परिणाम काय होईल? हे दिसेलच. Parbhani NCP Ajit Pawar Group

पण अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा आणि त्याचे भाजपकडून केले जात असलेले राजकारण यामुळे देशातील अल्पसंख्याक समाजाच्या मनात चिंतेचे वातावरण आहे आणि ती चिंताच दुर्राणी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी हे पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, पाथरी येथील त्यांच्या होमपीचवर त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुर्राणी यांच्या पॅनेलसमोर तगडे आव्हान उभे केले. खान यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सदस्यही निवडून आले. तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी खान यांनी निधी खेचून आणला. Marathwada

साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरी आणि निधी वर्ग करण्याकरिता खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. पाथरीच्या राजकीय इतिहासात दुर्राणी यांच्यासमोर पहिल्यांदाच राजकीय आव्हान उभे राहिले. त्यामुळे दुर्राणी (Babajani Durrani) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील आपले स्थान बळकट करण्यासाठी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा जुनाच सूर आळवल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT