Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार पक्ष बांधणीसाठी पुन्हा मैदानात उतरले. आपली साथ सोडून गेलेले पुन्हा कधीही निवडून आलेले नाहीत, असा इशाराच अजित पवार गटातील आमदारांना दिला.
इतिहासातील या घडामोडी विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना माहिती आहेत. त्याच घडामोडींचा दाखला शरद पवार गटात परतल्यानंतर दुर्राणींनी दिला आहे. त्यामुळे पवारांचा धाक अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बाबाजानी दुर्राणी Babajani Durrani यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांचा प्रवेश कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
घरवापसीनंतर बाबाजानी दुर्राणी म्हणाले, शरद पवार साहेबांना यापूर्वी अनेक जण सोडून गेले होते, मात्र त्यातील बहुतांश जण पुन्हा विधानभवनात कधीही दिसले नाहीत. ते शून्य झालेले मी पाहिले आहेत. बरे झाले मी शून्य होण्याआधीच परत आलो, अशी बिनधास्त प्रतिक्रिया दुर्रानी यांनी दिली.
देशात गेल्या 10 वर्षांत जातीवाद पसरवला आहे. त्यामुळे मुस्लिम सामाजाची शरद पवार Sharad Pawar यांच्याकडून आजही मोठ्या अपेक्षा आहेत. मी पवार साहेबांना सोडल्याची खंत वाटते. लोकसभेत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात परिवर्तन दिसले. त्यावेळी कुठेही असलो तरीही आम्ही आतून त्यांच्यासोबतच होतो. आता देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे, अशी सदिच्छाही दुर्राणी यांनी व्यक्त केली.
एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबाजानी दुर्राणी यांची शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. त्यावेळी दुर्राणी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध चांगले नव्हते. मात्र पक्ष फुटीनंतर बाबाजानी यांनी विधान परिषदेचा शिल्लक कार्यकाळ आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात मुलगा जुनेद याची राजकीय घडी बसवण्यासाठी अजित पवारांची साथ दिली.
मात्र त्याचा त्यांना फायदा होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या छत्रछायेखाली परतण्याची भूमिका घेतली. शरद पवारांनीही आपल्या जुन्या सहकाऱ्याबाबत मवाळकीची भूमिका घेत त्यांना मोठ्या मनाने स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.