बीड नगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या बैठकीला फक्त ४० कार्यकर्ते उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली.
मोठ्या राजकीय बैठकीचा दावा असतानाही कमी उपस्थितीमुळे स्थानिक पातळीवर चर्चा रंगली.
या घटनेमुळे भाजपच्या बीडमधील संघटनशक्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दत्ता देशमुख
Local Body Election News : बीड नगर परिषदेत 52 सदस्य निवडून आणण्याचा दावा आणि सत्ता मिळवण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपाने बोलावलेल्या बैठकीत मोजून 40 लोकही हजर नव्हते. त्यामुळे पत्रकबाजीतून क्षीरसागरमुक्तीचे नारे देणाऱ्या भाजपाला यातून बाहेर पडत संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. सत्तेचा दावा सांगत असताना नियोजनासाठीच्या बैठकीलाच पदाधिकारी, कार्यकर्ते जमत नसतील तर भाजपाच्या दाव्याचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
आता संघटनात्मक स्थितीत अधिक बळकट करत पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून मेहनत करण्याची गरज आहे. बीड नगरपालिका आणि क्षीरसागर हे 30 वर्षांपासूनचे समीकरण आहे. हा विधानसभा मतदारसंघही युतीमध्ये शिवसेनेकडे होता. त्यामुळे बीडमध्ये भाजपला (BJP) बांधणी करता आली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही 'क्षीरसागर युती'परंपरा कायम असल्याने बीडमध्ये लक्ष घालावे वाटले नाही.
परिणामी पक्षाला मानणारा मोठा मतदारवर्ग शहरात असला तरी शहरात पक्षाचा खंबीर चेहरा आणि संघटन उभारले गेलेच नाही. नगरपालिकेतील सत्ता व विधानसभा क्षीरसागरांकडे असल्याने आणि भाजप नेत्यांचे क्षीरसागरांशी सख्य असल्याने बीडमधील (Beed News) भाजपचा सांभाळच कायम क्षीरसागरांकडे राहिला. त्यामुळे पत्रकापुढे पक्ष, संघटन काही विस्तारले नाही.
थोडे मागे वळून पाहीले तर 2012 च्या निवडणुकीत 50 पैकी पक्षाला एकही नगरसेवक विजयी करता आला नाही. मागच्या वेळी 50 नगरसेवकपदाचे उमेदवार पक्षाला उभा करता आले नाहीत. विशेष म्हणजे त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही पक्षाकडे असताना नगराध्यक्षपदाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर गेला. त्यातही नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाच्या हितासाठी होता, हे बीडकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही.
दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक बदलात आताचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख स्थानिक नेत्यांपेक्षा पक्षाचे आहेत ही जमेची बाजू आहे. रमेश पोकळे व राजेंद्र मस्के यांच्यापेक्षा संघटात्मक बांधणीत त्यांचा वकूब आहे. मात्र, शहराच्या मुद्द्याला त्यांनी अद्याप तरी हात घातल्याचे दिसत नाही. शहर मंडळाचे अध्यक्ष अशोक लोढांनी एक-दोन निवेदने आणि एक आंदेालन यापेक्षा अधिक काही केले नाही.
आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांचा आढावा, मुलाखती अशा औपचारिकता सुरू असल्या तरी बीड नगरपालिका 52 नगरसेवकांची असल्याने समोर 40 लोकांची उपस्थिती पक्षासाठी भूषणावह निश्चितच नाही. विशेष म्हणजे उपस्थितीत 40 शहरातले की बाहेरचे? आणि त्यांचा राजकीय वकूब व ताकद किती? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
1. बीडमध्ये भाजपची बैठक का झाली होती?
भाजपने बीड नगरपालिकेवर सत्ता स्थापनेसाठी रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेतली होती.
2. बैठकीत किती लोक उपस्थित होते?
माहितीनुसार फक्त सुमारे ४० कार्यकर्तेच उपस्थित होते.
3. कमी उपस्थितीचे कारण काय सांगितले जात आहे?
स्थानिक नाराजी, अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक दुर्लक्ष हे प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
4. बैठकीत प्रमुख नेते कोण होते?
जिल्हा भाजपचे काही स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
5. या घटनेवर स्थानिक प्रतिक्रिया काय आहे?
कार्यकर्त्यांच्या कमी उपस्थितीमुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली असून, पक्षाच्या संघटनशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.