Ayodhya Ceremony Sarkarnama
मराठवाडा

Ram Mandir Inauguration : अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं 'बीड' कनेक्शन!

Datta Deshmukh

Beed News : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण आणि प्रभू श्रीरामाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला. सर्वत्र जय श्रीराम..., सीयावर रामचंद्र की जय... आदी घोषणा कानी पडत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याकडे केवळ देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले होते. तर या ऐतिहासिक सोहळ्याशी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा संबंधही समोर आला आहे. ज्यामुळे बीडकरांची छाती अभिमानाने फुलल्याचे दिसत आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे मुख्य पौराहित्याचे भाग्य बीड जिल्ह्याला मिळाले. मूळचे बीड तालुक्यातील कळसंबरचे रहिवासी आणि बीडमध्ये स्थायिक असलेल्या गजानन ज्योतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व विधी करुन घेतले आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल आदींची उपस्थिती होती आणि अवघा देश हा सोहळा डोळेभरून पाहत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील काही दिवसांपासून अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी सुरू होते. यासाठी देशभरातील 121 पौराहित्य सेवा करत आहेत. काशीचे लक्ष्मीकांत दिक्षीत यांच्या अधिपत्याखाली सर्व विधी, स्थळ, मुहूर्त निश्चित केले जात आहेत. लक्ष्मीकांत दिक्षीत यांचेच शिष्य असलेल्या गजानन ज्योतकर यांना गाभाऱ्यातील विधीचा मान मिळाला. बीड(Beed) जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी सुद्धा ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

गजानन ज्योतकर यांचे वडील दिलीप ज्योतकर हे भिक्षुकी करायचे आणि आई कावेरीबाई गृहिणी आहेत. भाऊ दिपक यांचे बीडला एक दुकान असून त्यांना गीता ही विवाहित बहिण आहे. गावाकडे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर गजानन ज्योतकर यांनी येथील सावरकर महाविद्यालयात उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी धुळे येथील श्रीराम वेद विद्यालयात पौराहित्याचे शिक्षण घेतले. तर, आळंदी (जि. पुणे) येथील सद्गुरु निजानंद महाराज विद्यालयात वेदाच्या संहितेचे शिक्षण पूर्ण केल्याचे या संस्थेचे ढालेगाव (जि. परभणी) येथील व्यवस्थापक कमलाकर पाठक यांनी सांगीतले.

यानंतर त्यांनी काशी येथील लक्ष्मीकांत दिक्षीत यांच्याकडे वेदशिक्षण घेतल्याचेही पाठक म्हणाले. अयोध्येच्या मंदिराची उभारणीपासून, मूर्ती बनविणे, तारीख निश्चित करणे या सर्व शास्त्रोक्त बाबी लक्ष्मीकांत दिक्षीत यांनी केल्या आहेत. त्यांचाच विद्यार्थी असल्याने गजानन ज्योतकर यांना मुख्य विधीचे पौराहित्य करण्याच हा मान मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या काशी (उत्तर प्रदेश) येथील बनारस हिंदू विद्यापीठात ते पीएच. डी. करत आहेत.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून काशीला वास्तव्यास असलेले गजानन ज्योतकर दिवाळीसाठी कुटूंबियांना भेटायला आले होते. आपण आयोध्येच्या श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला असणार अशी कल्पना त्यांनी दिली होती. भाऊ दिपकलाही त्यांनी येण्याचे निमंत्रण दिले होते. तर, गाभाऱ्यात पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे विधी करुन घेणारे गजानन ज्योतकर असल्याचे टीव्हीवर पाहिल्यानंतर केवळ कुटुंबीयच नव्हे तर बीडकरी अव्वाक झाले होते.

मंदीराची पायाभरणी, इतर सर्व विधी, मूर्ती तयार करणे, विविध विधी, होम, हवन यासाठी देशभरातील पौराहित्यांची निश्चिती अशा सर्व प्रक्रीयेत गजानन ज्योतकर होते. मात्र, सुरक्षेच्या कारणांनी त्यांनी सांगीतले नव्हते, असे बंधू दिपक ज्योतकर यांनी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT