Massajog People Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : सरपंच देशमुख खून प्रकरणी जरांगे पाटलांची मध्यस्थी, पोलिसांकडून ठोस आश्वासनं अन् 26 तासांनी 'पोस्टमार्टेम'

Santosh Deshmukh Murder Case : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आधी अपहरण आणि नंतर खून करुन फेकून दिल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थितीत करत लोकप्रतिनिधी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Datta Deshmukh

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग येथील आदर्श गाव करणारे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास 26 तासांनी ग्रामस्थ व नातेवाईकांनी होकार दिला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर हा मार्ग निघाला.

संतोष देशमुख यांचे सोमवारी केज जवळून अपहरण करण्यात आले. यानंतर तीन तासांनी म्हणजे 6 वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला होता. मंगळवारी (ता.10) रात्री आठ वाजता म्हणजे 26 तासांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास नातेवाईक आणि ग्रामस्थांनी होकार दिला.

सर्व आरोपींना अटक करावी, घटनेमागील सूत्रधार शोधावा, गुन्हा नोंद करण्यास आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या केज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी अहमदनगर - अहमदपूर रस्ता तब्बल नऊ तास रोखून धरला होता. शेकडो महिला व ग्रामस्थ सोमवारी रात्री सात ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ठिय्या मांडून होते. मंगळवारी पुन्हा दुवसभर आंदोलन झाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

मनोज जरांगे व पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी रात्री अखेर हा वाद मिटवण्यात यश आले. यावेळी झालेल्या चर्चेत केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे तत्काळ निलंबन, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची चौकशी करून निलंबनाचा प्रस्ताव दोन दिवसांंच्या आत वरिष्ठांकडे पाठविणार, तक्रारदारास पोलीस संरक्षण देणार, या प्रकरणात सरकारी वकील देणार तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी शासनाकडे करणार या मागण्या मान्य करण्यात आल्या.

त्यामुळे घटनेच्या सवीस तासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी संमती दर्शवली. रात्री उशिरा मस्साजोग येथील शिंदी रस्त्यालगत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आधी अपहरण आणि नंतर खून करुन फेकून दिल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.

बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थितीत करत लोकप्रतिनिधी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT