मराठवाडा

Beed News : बीडची फिल्मी स्टाइल स्टोरी; बलात्कारात कोठडीत असताना सरकारी नोकरीत रुजू

Datta Deshmukh

Beed News : एखाद्या सिनेमातील व्हिलन पोलीस कोठडी किंवा कारागृहात शिक्षा भोगत असताना खुलेआम बाहेर जाऊन गुन्हा करतो आणि आपण कोठडीत असल्याचे कागदपत्रावरुन सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. असाच काहीसा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विस्तार अधिकारी असलेल्या आदित्य अनुप धन्वे यास नुकतीच बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. मात्र, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर तो पोलीस (Police) कोठडी व न्यायालयीन (Court) कोठडीत असतानाच्या कालावधीत तो आरोग्य विभागात रुजू झाल्याचे कागदपत्रांवरुन समोर आले आहे. त्याच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई देखील केली आहे.

मात्र, ता. २६ फेब्रुवारी २०१९ ला त्याने महिलेवर अत्याचार केल्यावरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. कागदत्रांमध्ये आदित्य धन्वे हा २६ फेब्रुवारी २०१९ ते २२ मार्च २०१९ या कालावधीत पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीत होता. मात्र, त्याला सात मार्च २०१९ रोजी अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाली.

तसेच, त्याने २० तारखेला रुजू झाल्याचा अहवाल देखील दिला आहे. म्हणजे कोठडीत असताना तो रुजू झाल्याचे कागदपत्रांवरुन दाखवित आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद असताना पोलीस विभागाने त्याला चांगल्या चारित्र्याचे प्रमाणपत्र देखील दिले आहे. बलात्कारातील आरोपी असलेल्या आदित्य धन्वे याने कागदपत्रांत हेराफेरी तर केलीच. पण, येथील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पोलीस विभागाने डोळे झाकून त्याला रुजू करुन घेणे व त्याला चांगल्या चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्यामागे नेमके दडलेय काय, असा प्रश्न आहे.

त्याच्या निलंबनाच्या तीन पानी आदेशात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या निरीक्षणातून आदित्य धन्वेच्या कारनाम्यांना आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या ढिसाळपणामुळे एखाद्या सिनेमाचा कथानक सारखा प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT