Shivajirao Pandit and Sundarrao Solanke Sarkarnama
मराठवाडा

Beed District Politics : 13 निवडणुकांमधून बीड जिल्ह्यातून 89 आमदार विधानसभेत; शिवाजीराव पंडितांमुळे एकमेव सुंदरराव सोळंके बिनविरोध!

Shivajirao Pandit and Sundarrao Solanke : कारखाना उभारणीसाठी मदत करण्याच्या सुंदरराव सोळंके यांच्या शब्दाखातर शिवाजीराव पंडित गेवराईतून विधानसभा निवडणुक रिंगणात उतरले नाहीत.

Datta Deshmukh

Beed District Political History : 1962पासून विधानसभांच्या 13 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयी होत जिल्ह्यातील 89 आमदारांनी विधीमंडळात प्रवेश केला. यापैकी एकमेव दिवंगत सुंदरराव सोळंके यांना बिनविरोध विधानसभेत जाण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनाच आहे.

माजलगाव मतदार संघातील रहिवाशी असलेल्या दिवंगत सोळंकेंना जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्या पाठबळामुळे गेवराईतून बिनविरोध विजयी होता आले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी मदत म्हणून शिवाजीराव पंडित यांनी सुंदरराव सोळंके यांचा विधानसभेत बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा केला.

जिल्ह्यात पुर्वी रेणापूर, केज, चौसाळा, माजलगाव, आष्टी, गेवराई व बीड(Beed) हे सात विधानसभा मतदार संघ होते. मतदार संघाच्या पुनर्रचनेत 2009 साली चौसाळा मतदार संघाचा काही भाग बीड व काही भाग केजमध्ये विलीन झाला. तर, रेणापूर मतदार संघात असलेला परळी मतदार संघ स्वतंत्र झाला. तेव्हापासून जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या काळात 13 सार्वत्रिक निवडणुका तसेच केज मतदार संघाची पोटनिवडणुक असे सर्व 89 आमदार जिल्ह्यातून विधानसभेत पोहचले. यातील एकमेव सुंदरराव सोळंके बिनविरोध विधानसभेत पोहचले.

दरम्यान, 1962, 1967 आणि 1972 या सुरुवातीच्या तीन टर्म केज मतदार संघ खुला होता. पुढे हा मतदार संघ अनुसुचित जाती (एससी) साठी राखीव झाला. दिवंगत सुंदरराव सोळंके यांचे गाव मोहखेड (ता. धारुर) आहे. 1967 साली दिवंगत सोळंके प्रथम केज मतदार संघातून विधानसभेत पोहचले. गोदावरी नदी गेलेल्या गेवराई भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासाठी जवळ कारखाना नव्हता.

ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी गढी (ता. गेवराई) येथे जयभवानी कारखाना उभारणीचे काम हाती घेतले होते. कारखाना उभारणीसाठी मदत करण्याच्या सुंदरराव सोळंके यांच्या शब्दाखातर शिवाजीराव पंडित गेवराईतून विधानसभा निवडणुक रिंगणात उतरले नाहीत. त्यांनी कॉंग्रेसच्या सुंदरराव सोळंके यांच्या बिनविरोध विजयाची वाट मोकळी केली.

यावेळी विधानसभेत पोहचलेल्या सुंदरराव सोळंके यांना जेष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. सोळंके राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या होमपिच माजलगाव मतदार संघातून ते त्यानंतरच्या 1978 सालच्या निवडणुकीत विजयी झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT