Marathwada News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका टोळक्याने विलास घुले या तरुणाची हत्या केली. हॉटेलमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या घुले यालाच आरोपींनी संपवले. या हत्येनंतर फरार आरोपींना अटक करा, खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलागा सौरभ सोनवणे यांचे एफआयआरमध्ये समावेश करा, आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी तीन दिवसात केज येथे ग्रामस्थ आणि मृताच्या नातेवाईकांनी पाच वेळा रास्तारोको केला आहे. यामुळे केजमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अशातच विलास घुले हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देखील विधीमंडळात आरोपींना अटकण्यासह कटाचा सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलणार आहोत, तसेच बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांना आरोपीवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचे म्हटले आहे.
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करत दहा हजार लोक रस्त्यावर उतरले आहेत, पोलीस मुख्य आरोपीला अटक करत नाहीत, या घटनेमागच्या सूत्रधाराचे नाव घेत नाही, असा आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केलीय. यादरम्यान आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
20 जून रोजी रात्री साडेआठ वाजता केज तालुक्यातील टाकळी फाटा, कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरीमध्ये ही घटना घडली होती. बीड-केज राष्ट्रीय महामार्गावरील समर्थ बिअर बार समोर विलास नवनाथ घुले, रा. टाकळी ता. केज. या तरुणाचा मृतदेह आढळला होता. विलास घुले आपला पार्टनर आकाश चाळक याच्यासोबत 'गावकरी हॉटेल' चालवत होता. टाकळी फाटा येथील उमेश माने या तरुणाचे बाबासाहेब कदम याच्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद, भांडण सुरू होते.
या वादातूनच बाबासाहेब कदम, त्याचा भाऊ मंगेश, सासरा रामेश्वर गायकवाड हे स्कॉर्पिओ गाडीतून हॉटेलवर आले आणि त्यांनी उमेश मानेला 'तुझा मर्डरच करतो' म्हणत मारहाण सुरू केली. ही मारहाण सुरू असताना उमेश माने जीव वाचवण्यासाठी तिथून पळू लागला. हा प्रकार पाहून विलास घुले आणि नितीन घुले त्याला वाचवण्यासाठी पुढे आले. समर्थ बिअर बारसमोर राष्ट्रीय महामार्गावर आरोपींनी विलासला अडवले. 'तू मध्ये का पडतोस' म्हणत बेदम मारहाण केली.
रामेश्वर गायकवाड रा. सोनीजवळा याने सोबत आणलेला चाकू विलासच्या पोटात खुपसला. या हल्लात विलास गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घुले याचे कुटुंबिय आणि गावकरी आक्रमक झाले. त्यांनी हल्लेखोरांच्या अटकेची मागणी करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वातावरण तापले होते.
दरम्यान, केज पोलीसांनी या खून प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला. यात मुख्य आरोपी बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय ऊर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम यांचा समावेश आहे. पैकी सहा आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी रात्री बाबासाहेब कदम याला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
विलास घुले याच्या हत्येनंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केला. सगळ्या आरोपींना अटक करून मकोका लावा, हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली. आज विधीमंडळात देखील मुंडे यांनी या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश पोलीसांना द्यावेत, या कटामागचे खरे सुत्रधार शोधावेत, अशी मागणी केली.
पावणे दोन वर्षापुर्वी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्यासह आठ आरोपी अटकेत असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. असे असतानाच पुन्हा केज तालुक्यातच विलास घुले या तरुणाची टोळक्याकडून हत्या झाल्याने त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे याने आरोपींना मदत केल्याचा आरोप करत त्याचे नाव एफआयआरमध्ये घ्या, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.