Beed Lok Sabha Election Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha Election : मुंडेंची लेक म्हणून प्रेम करा, पण मत माझ्या नेतृत्व- कर्तृत्वाला द्या; पंकजांचे बीडकरांना आवाहन!

Lok Sabha Election 2024 : 'मी प्रीतम मुंडेंची मोठी बहिण असल्याने अधिक मतांनी दिल्लीला पाठवा' ; पंकजा मुंडे..

Datta Deshmukh

Beed News : गेल्या निवडणुकीत पाच लाख मतं घेणाऱ्यांनी पाच वर्षांत जनतेचा चेहरा तरी पाहिला आहे का? असा सवाल करत समाजातील सर्व घटकांचे हित साधत वंचित, उपेक्षितांचे स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत. दिवंगत लोकनेते मुंडेंची लेक म्हणून माझ्यावर जरूर प्रेम करा, पण मला मतदान करतांना माझ्यातील नेतृत्व, कर्तृत्वाला मतदान करा. तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज आहे, त्याची परतफेड जिल्ह्यात विकासाची कामे करूनच करेन, असा विश्वास भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना दिला.

इथली जनता फार दुरदर्शी आहे. जिल्ह्यात बसून त्यांना मुंबई-दिल्ली दिसते. इथल्या जनतेने कायम आपल्या नेतृत्वाला जपलेले आहे. दिवंगत मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडेंना मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. मी प्रितम मुंडेंची मोठी बहिण असलल्याने त्यांच्यापेक्षा अधिकचे मताधिक्य देवून मला दिल्लीत पाठवा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले. जिल्ह्यातील पाटोदा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, रामकृष्ण बांगर, दशरथ वनवे, शिवाजी राऊत आदींची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे म्हणाल्या, "बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढत सर्वांना अभिमान वाटेल असे काम मी करून दाखवेल. 2014 ते 2019 या कालावधीत मी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केलेले काम समोर ठेवा. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या. महायुतीची उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांसमोर आले आहे. आपण सर्वांनी माझ्या निवडणुकीमध्ये मला सहकार्य करत भरघोस मतदान करुन प्रचंड मताधिक्क्याने मला निवडून देत संसदेत पाठवा."

बजरंग सोनवणेंची टोलेबाजी -

जातीवादाच्या आधारावर मते मागण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाला यश येणार नसल्याचे लक्षात आल्याने मुंडे भावंडांनी आता अनेकांना आमदार करण्याचे स्वप्न दाखवित असल्याचा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना लगावला.

भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) व त्यांचे कुटूंब सत्तेत असताना विकास करु शकले नाहीत. विद्यमान खासदारांना 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांचा विकास फंड खर्च करता आला नाही, असा गंभीर आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला. आता मते मिळविण्यासाठी विद्यामान आमदारांना सोडून त्या अनेकांना विधानसभेला आमदार करण्याचे स्वप्न दाखवीत आहेत. मात्र जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा किती, त्याहून अधिक जणांना आमदार करण्याचे खोटे आश्वासन देत मुंडे बहीण - भाऊ किती जणांना देणार, असा सवालही बजरंग सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT