Beed News : भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे खुद्द बड्या नेत्या आहेत. त्यांना जिल्ह्यातील स्वपक्ष भाजपच्या आमदार व इतर नेत्यांसह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री मंत्री व आमदार तसेच इतर नेते आहेत. या सर्व मातब्बर नेत्यांच्या साथीला आता बाहेर जिल्ह्यातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची कुमक देखील जिल्ह्यात दाखल झाली आहे.
पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. बजरंग सोनवणे यांच्या बाजूने असलेल्या नेत्यांमध्ये केवळ एक आमदार आहे. तर उर्वरीत सर्व माजी आमदार व दुसऱ्या फळीतील नेते आहेत. तुलनेने भाजपच्या पंकजा मुंडे याच खुद्द बड्या नेत्या आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पालकमंत्री धनंजय मुंडेंसारखा बडा नेता आणि त्यांच्या पक्षाचेच आमदार बाळासाहेब आजबे व प्रकाश सोळंके व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी देखील पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी झोकून दिले आहे. त्यांच्या पक्षाच्या खासदार आणि बहिण डॉ.प्रीतम मुंडे,आमदार सुरेश धस,आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा प्रचारात पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे (BJP) रमेशराव आडसकर, मोहन जगताप, केशव आंधळे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के त्याच बरोबर शिवसेनेचे अनिल जगताप, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक असे राजकीय ताकदीचे नेते सभा, बैठका, कॉर्नर बैठका, बुथ प्रमुखांचे मेळावे, गावनिहाय संवाद दौऱ्यांनी मतदार संघ पिंजून काढत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद गटांमध्ये राजकीय वकुब असलेली माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध संघटनांच्या नेत्यांची फळीही प्रचार करत आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही अंबाजोगाईत सभा झाली. मात्र, जिल्ह्यातील या मातब्बर नेत्यांच्या मदतीला आता लातूर जिल्ह्यातील भाजप,राष्ट्रवादी नेत्यांची कुमक दाखल झाली आहे.
लातूर लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने या जिल्ह्यातील माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. इतर नेते येऊन देखील सभा घेऊन जात आहेत. मात्र, लातूरची मंडळी जिल्ह्यातच थांबून राहणार आहे. पंकजा यांच्या विजयासाठी या सर्व नेत्यांनी जोर लावला असून लोकसभा निवडणुकीत अधिक मताधिक्य कसे मिळेल, यासाठी ही तयारी केली जात आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.