Pankja munde, bajrang sonavane  Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha News : बीडमध्ये तुतारी की कमळ ? राजकीय विश्लेषकांचे म्हणणे काय...

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी झालेल्या निवडणुकीत सोमवारी चुरशीने मतदान झाले. विशेषता या निवडणुकीत राज्यातील ११ जागांवर मतदान पार पडले. यावेळी बीड मतदारसंघात हाय होल्टेज लढत पाहवयास मिळाली. या राज्यातील लक्ष लागलेल्या जागेवरचा कल काय असणार ? याविषयी सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले आहे. त्यामुळे या बीडच्या जागांचा कल काय असणार याचा अंदाज यामधून येतो.

बीड मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या ठिकाणी महायुतीकडून माजी मंत्री पंकज मुंडे (Pankaja Munde) या रिंगणात उतरल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनावणे (Bajrang Sonavane) यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. सुरवातीला एकतर्फी वाटणारी लढत पुढे जाईल तशी रंगतदार ठरली. मुंडेंच्या प्रचारार्थ पीएम मोदींनी सभा घेतली तर दुसरीकडे सोनावणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा पार पडली. त्यामुळे नंतरच्या काळात या हाय होल्टेज लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली होती. (Beed Lok Sabha News )

बीडच्या जागेवर भाजपने यापूर्वी दोन वेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी न देता माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. बीडच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे ही लढत भाजप व शरद पवार गटाने चुरशीची केली होती. याठिकाणी ही शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष प्रचारादरम्यान पाहावयास मिळाला. प्रचाराचा धुराळा बसेपर्यंत दोन्हीकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप झाले. त्याशिवाय वैयक्तिक टीका करण्यात आली, असेही देसाई म्हणाले.

बीड मतदारसंघाच्या या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना देसाई यांनी काही मुद्दे मांडले. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. जवळपास 70 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसले. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरात चर्चा सुरु होती. दुसरी गोष्ट भाजपची यंत्रणा निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसली तर त्यांनी पुणे, मुंबई व परगावावरून मतदान बोलावून घेतले होते. त्यामुळे त्याचा फायदा पंकजा मुंडेंना होताना दिसत आहे.

पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलनाच्या विरोधात वक्तव्य केले. त्यामुळे त्या काहीश्या निवडणुकीत बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहवयास मिळते. त्याशिवाय या ठिकाणी मराठा समाजाचा अंडरकरंट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हा अंडर करंट महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या सोनावणे यांना झाला आहे. त्यामुळेच तुतारी विरुद्ध कमळ ही अटीतटीची लढत झाली. या कांटे की टक्करमध्ये अल्पशा मतांनीच दोघांपैकी एकजण बाजी मारेल, असे चित्र आहे.

परळीत सर्वाधिक मतदान

बीड जिल्ह्यातील मुंडे बंधू-भगिनींचे होम पीच असलेल्या परळी मतदारसंघात जवळपास 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. या ठिकाणी भाजपची यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय दुसरीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ असल्याने याठिकाणी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यानी जुळवून घेत अनेक तडजोडी केल्या आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यंत्रणेचा फायदा पंकजा मुंडेंना झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभव सहन करावा लागला होता. हे विसरून चालणार नाही, असेही यावेळी देसाई यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT