Pankaja Munde Lok Sabha Election : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पंकजा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून नितीन गडकरी, खासदार उदयनराजे यांच्यापर्यंतचे सर्व बडे नेते बीडमध्ये आले होते. अगदी महायुतीत येईपर्यंत कट्टर राजकीय विरोधक असलेले अजित पवार यांनीही पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी हजेरी लावली. मात्र, राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत बीडकडे फिरकलेच नाहीत. भाजपच्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना बोलावण्यात आले नाही की आणखी कोणत्या कारणामुळे फडणवीस पंकजांच्या प्रचारासाठी आले नाहीत, असा सवाल आता रंगला आहे.
भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. खुद्द पंकजा मुंडे यांचीही दिल्लीला जाण्याची इच्छा नव्हती, तसं त्यांनी अनेक सभांमधून बोलून दाखवलं होतं. पण भाजपमध्ये आदेश मानण्याची पद्धत असून पंकजा मुंडे यांनीही त्यानुसार 24 एप्रिल रोजी बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज भरला. पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मराठा चेहरा बजरंग सोनवणे यांना तिकिट देण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची अंबाजोगाई येथे, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची माजलगाव येथे सभा झाली. शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale), माजी आमदार आशिष देशमुख यांनाही हजेरी लावली. खरं तर पवार आणि मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक. पण, महायुतीत आल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी सभा घेतली. उदयनराजे यांच्या आष्टी, केज, परळी येथे सभा झाल्या. पालकमंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांच्यावर बीडची जबाबदारी होती.
भाजप आणि महायुतीचे प्रमुख नेते प्रचाराला बीडमध्ये हजेरी लावत असताना भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पंकजा मुंडे यांच्या प्रचारापासून दूर होते. त्यांनी मुंडेंसाठी एकही सभा घेतली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही आलबेल तर आहे ना, असा सवाल उपस्थित होत आहे. का मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आधीच टार्गेट झालेले फडणवीस बीडकडे फिरकलेच नाहीत, अशीही चर्चा रंगली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू हा बीड आणि जालना या भागात होता. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या काळात फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे खुद्द फडणवीसांनीच बीडला येणे टाळले का, हेही कारण त्यामागं असू शकतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांना काही ठिकाणी विरोधालाही सामोरे जावे लागले आहे.
मराठा समाजाचा असंतोष थोपवण्यासाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना पक्षाकडून निरीक्षक म्हणून बीडमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच, प्रमुख नेते पंकजा यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये आलेला असताना देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सभा का घेतली नाही, अशी चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 2014 च्या काळात अंतर्गत संघर्ष पहायला मिळाला. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे पंकजा यांनी स्वतः ला संबोधले होते, त्यानंतर फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर वाढले होते. पुढच्या काळात त्या सत्तेपासून लांबच राहिल्या. हाही एक पदर या मुद्याला असू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.