Beed Municipal Council News : बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मुळूक यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्ष तथा पिठासिन अधिकारी प्रेमलता पारवे यांनी मुळूक यांची निवड जाहीर केली. दरम्यान, सारिका क्षीरसागर यांनी नगराध्यक्षांवर सत्तेचा दुरुपयोग करत अन्याय केल्याचा आरोप केला.
निवड प्रक्रियेत पारवे यांना मुख्याधिकारी शैलेश फडसे, उपमुख्याधिकारी सम्राट कदम यांनी सहकार्य केले. सुरुवातीला मुळूक यांनी व नंतर भाजपच्या सारिका क्षीरसागर यांनीही उमेदवारी भरली. मात्र, क्षीरसागर यांनी अर्ज माघारी घेतल्याने मुळूक यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी नगर पालिकेत घोषणा दिल्या. मुळूक यांच्यासह स्विकृत नगरसेवकांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस व इतरांचा 24 सदस्यांचा गट आहे. तर, भाजपकडे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक असा 13 सदस्यांचा गट होता. स्विकृत नगरसेवकपदासाठी सत्ताधाऱ्यांनी अर्ज दाखल केलेले सय्यद मोईनोद्दीन सय्यद बशीरोद्दीन उर्फ मोईन मास्टर, दिनेश मुंदडा व भिमराव वाघचौरे या तिघांची तर बीड शहर विकास आघाडीच्या खान मनसुद उमर यांची आणि भाजपच्या अॅड. गोविंद शिराळे आणि रविंद्र कदम यांच्यापैकी अॅड. शिराळेंची निवड झाली.
स्विकृत नगरसेवकांची घोषणा होताच, भाजप गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागरांसह भाजप सदस्यांनी सभागृह सोडले. संख्याबळानुसार भाजपचे 2 स्विकृत नगरसेवक व्हायला हवे होते, मात्र नगराध्यक्षांकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करत 'तानाशाही नही चलेगी' अशा घोषणा त्यांनी व समर्थकांनी दिल्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
विनोद मुळूक चौथयांदा पालिकेत प्रतिनिधित्व करत असून त्यांनी सभापती म्हणूनही काम केलेले आहे. स्वभावाने शांत असलेले मुळूक मुत्सदी राजकारणी आहेत. एकेकाळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक असलेले मुळूक यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. उमेदवारी मागण्याऐवजी उमेदवारी देणारे होऊ, असे म्हणत त्यांनी पंडित यांचे नेतृत्व स्विकारले. पंडितांनीही त्यांना न्याय दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व या गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची बैठक आमदार संदीप क्षीरसागर व सय्यद सलिम यांच्या उपस्थितीत होऊन उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी निवडीपुर्वी सोशल मिडीयावर केली. मात्र, या पदासाठी निवडणूकच झाली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.