Municipal Corporation Election : स्वबळावर लढणाऱ्या राजकीय पक्षांची ताकद दिसणार, संभाजीनगरमध्ये खान-बाण-की भगव्याची शान?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election : तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी दिग्गजांनी ताकद पणाला लावली असून निकालानंतर संभाजीनगरमध्ये खान-बाण-की भगव्याची शान हेच समोर येणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दहा वर्षांनंतर होत असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार काल संपला आहे.

  2. बहुतेक सर्व प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे (‘एकला चलो रे’) मोठ्या संख्येने जागा लढवल्या आहेत.

  3. प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे निवडणूक वातावरण तापले असून निकाल अंतिम टप्प्यातील रणनीतीवर अवलंबून आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : दहा वर्षानंतर होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार काल संपला. निवडणुक आयोगाने आजही पाच जणांना मतदारांच्या भेटी घेण्याची मुभा दिली आहे. आता या संधीचा फायदा कोण कसा घेणार? यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची इतकी गर्दी होती, की प्रत्येकाची 'मी नगसेवक झाल्यासारखं वाटतयं' अशी अवस्था होती. परिणामी महायुती-महाविकास आघाडी कोलमडली आणि सगळ्यांनीच स्वबळाच्या बेंडक्या फुगवल्या.

शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह वंचित, एमआयएम यांनीही 'एकला चलो रे' म्हणत प्रचाराचे मैदान गाजवले. कधी नव्हे ते एमआयएम वगळता सगळ्याच पक्षांनी 70 ते 95 पर्यंतच्या जागा लढवल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन, अकबरोद्दीन ओवेसी या प्रमुख नेत्यांनी महापालिका निवडणुकीचा माहौल बनवला.

'खान हवा की बाण' 'औरंगाबाद हवे की संभाजीनगर' या मुद्यांनी शिवसेना-भाजप या दोन पक्षांनी गेली वीस वर्ष शहरवासियांनी सत्ता दिली. पण अजूनही मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरातील लोकांना वर्षातील 365 पैकी फक्त 44 दिवस पाणी मिळते. तरीही सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांकडून निवडणुक प्रचारात विकासाचे ढोल बडवले गेले. शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले, त्यामुळे औरंगाबाद की संभाजीनगर? हा मुद्दा निकाली निघाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
municipal elections : दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा मोठा हातोडा! मतदानाआधीच ओळखपत्रांबाबत नवा कडक नियम

खान-बाणचा मुद्दा जोपर्यंत शिवसेना-भाजप आणि एमआयएम हे पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत तो संभाजीनगरमध्ये सुरूच राहणार आहे. भाजपने मात्र सोयीनूसार भूमिकेत बदल करत 'ना खान ना बाण, राखू भगव्याची शान' अशी नवी घोषणा देत युती तोडणाऱ्या शिवसेनेला डिवचले. तर बाणाशिवाय भगव्याची शान राखली जाऊ शकत नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला. कितीही नाही म्हटलं तरी सत्ताधारी पक्षांनाही विकास कामांपेक्षा भावनिक मुद्यांवरच अधिक जोर द्यावा लागल्याचे गेल्या दहा-पंधरा दिवसांच्या प्रचारातून दिसून आले.

देवाभाऊंचा जोर विकास कामांवर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात घेतलेल्या टॉक शो मधून विकास कामांवर भर देत मतदारांना आवाहन केले. हिंदू की मराठी या प्रश्नावर मराठी म्हणत विकासासोबतच अस्मिता आणि मराठीच्या मुद्यावर आपलाही हक्क असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. स्थानिक भाजप नेत्यांना शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर त्याचे खापर शिवसेनेवरच फोडत भाजपने निवडणुकीत पराभव झाला तर त्याची जबाबदारी शिवसेनेवर टाकण्याची सोय आधीच करून ठेवल्याचे यातून दिसून आले. बंडखोरी आणि निष्ठावंतांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स प्रतिमेला इथे तडा गेलेला पहायला मिळाला.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
Jalna Municipal Election : 'कल्याण'ला निवडून देऊन तुमंच काय कल्याण झालं? काम करूनही मला का पाडलं? महापालिका प्रचारात दानवेंनी स्वतःचंच दुःख मांडलं!

शिवसेनेचा तोरा कायम..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात मोठे यश मिळाले. एक खासदार आणि सहा आमदार निवडून आल्यामुळे शिवसेनेने संभाजीनगरमध्ये आम्हीच मोठा भाऊ अशी भूमिका घेतली. यावर युतीमुळेच हे यश मिळाले याची आठवण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला करून दिली. यातूनच शिवसेनेपुढे नमते घ्यायचे नाही ही रणनिती ठेवून भाजपने आपली स्वबळाची हौस पूर्ण करून घेतली. युती तुटल्याचे खापर भाजपने शिवसेनेवर फोडल्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट हे व्हिलन ठरले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तेमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आव्हान अजूनही या पक्षासमोर असणार आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी आणलेला निधी त्यातून झालेली विकास कामे या जोरावर शिवसेनेने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्या हर्षदा आणि मुलगा सिद्धांत यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील अनेक इच्छुक नाराज आहेत. शिवाय शिरसाट यांनी सगळे लक्ष मुलगा आणि मुलीच्या प्रभागावरच केंद्रीत केल्याने इतर भागात त्यांनी फारसा वेळ दिला नाही. एका उमेदवाराने तर चक्क मतदारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन जाहीरपणे केल्याने पक्षाची नाचक्कीही झाली.

ठाकरेंची मशाल धगधगणार?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पाटी कोरी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खरी परीक्षा महापालिका निवडणुकीत लागणार आहे. माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांच्या पक्ष प्रवेशाने या पक्षाला निगेटीव्ह आणि पॉझीटीव्ह अशी प्रसिद्धी मिळाली. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा ठाकरेंच्या पक्षाचा हा प्रयत्न फसतो की यशस्वी होतो? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
Municipal Election : 'भाऊ-बहिणी'चा डंका! नगराध्यक्ष पदी बहीण, तर उपनगराध्यक्ष पदी भावाची बिनविरोध निवड

पक्षाच्या प्रचाराची सगळी धुरा अंबादास दानवे यांच्या खांद्यावर होती. उद्धव ठाकरे यांनीही एक सभा घेत आपले प्राधान्य मुंबई महापालिकेलाच असल्याचे दाखवून दिले. नाशिक, मुंबई प्रमाणेच संभाजीनगरमध्येही उद्धव आणि राज ठाकरे यांची एक संयुक्त सभा होणे गरजेचे होते, असे बोलले जाते. शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याचा निश्चितच फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. पक्षातील नेते सोडून गेल्यामुळे आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 96 उमेदवार दिल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

एमआयएमच्या पंतगाला ओवेसींची हवा..

गेल्या महापालिका निवडणुकीत पंचवीस नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या एमआयएमसाठी यंदाच्या निवडणुकीचा पेपर तसा अवघडच होता. बावीस विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापल्याने बंडखोरी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात असलेला रोष रस्त्यावर दिसून आला. काळे झेंडे, धक्काबुक्की आणि इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेल्या जीवघेण्या हल्लाने महापालिका निवडणुकीचा आखाडा झाला होता.

असदुद्दीन ओवेसी यांनी शहरात पाय ठेवल्यानंतर ही परिस्थिती काहीसी आटोक्यात आली. अकबरोद्दीन ओवेसी यांच्या एका सभेने एमआयएमच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचे काम केले. तर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत गल्लीबोळात फिरून एमआयएम आणि इ्म्तियाज जलील यांच्याविरोधात असलेले वातावरण पालटवण्याचे काम केले. 48 उमेदवार उभे करत एमआयएमने मोजक्या प्रभागांवर लक्ष केंद्रीत करत आपली वोट बँक फुटणार नाही याची काळजी घेतली आहे. पण बंडखोर, नाराज आणि काँग्रेसकडून लढणाऱ्या माजी नगरसेवकांचा उपद्रव किती होतो? यावर एमआयएमचा पतंग किती उंच उडणार हे ठरणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी-वंचितलाही आशा..

स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्षही आशा बाळगून आहेत. वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर महापालिकेत खाते उघडण्याची शक्यता वाटते आहे. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी मोदीविरोधी भूमिका घेत मतदारांना आवाहन केले. वंचितकडे मोठी वोट बँक आहे. ती सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे वळणार नाही यासाठी वंचितला नाकेबंदी करावी लागणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
Municipal election 2026 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान आग; यंत्रणांची धावपळ

काँग्रेस पक्षानेही महायुती महाविकास आघाडी तुटल्यामुळे या संधीत हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तरहून अधिक उमेदवार पक्षाने मैदानात उतरवले आहेत. यात इतर पक्षातून उमेदवारी न मिळालेल्यांची संख्या अधिक आहे. भाजप, शिवसेना, एमआयएम या पक्षातील इच्छुकांचा यात अधिक भरणा आहे. या बाहेरून आलेल्या बंडखोरांपैकी काहीजणांची लाॅटरी लागली तर काँग्रेसचा महापालिकेतील आकडा वाढू शकतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही यंदाच्या निवडणूकीत जोर लावला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अडकून पडल्याने ते संभाजीनगरमध्ये येऊ शकले नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही प्रमाणात वेळ दिला. यावर घड्याळाची टिकटिक किती वाजणार? हे पहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र ही निवडणुक स्थानिक नेतृत्वावरच सोडली आहे. त्यामुळे या पक्षाचे खाते उघडले तरी बेहत्तर अशी परिस्थिती आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election
Pune municipal election: पुण्यात भाजपचा ठाकरे सेनेला मोठा धक्का; चंद्रकांत पाटलांनी सेनेच्या अधिकृत उमेदवारालाच दिला पक्षात प्रवेश

FAQs :

1. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक किती वर्षांनंतर होत आहे?
दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे.

2. प्रचार कधी संपला?
प्रचार काल अधिकृतपणे संपला आहे.

3. निवडणूक आयोगाने कोणती मुभा दिली आहे?
आजही प्रत्येकी पाच जणांना मतदारांच्या भेटी घेण्याची परवानगी दिली आहे.

4. कोणकोणते प्रमुख पक्ष लढत आहेत?
शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव गट), वंचित आणि एमआयएम.

5. कोणत्या नेत्यांनी प्रचारात प्रमुख भूमिका बजावली?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, असदुद्दीन व अकबरोद्दीन ओवेसी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com